-गव्हाच्या काडाला लागलेल्या आगीने घेतला भयंकर पेट; लाखोंचे नुकसान
लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील मेहनती शेतकरी सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांची एक हेक्टर आंब्याची बाग आगीत जळून खाक झाली. ही बाग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत तीन वर्षांपूर्वी लागवड करण्यात आली होती.
दि. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास शेजारील शेतकरी सदाशिव चौगुले यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला आग लागली. अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे ही आग वेगाने पसरत तेजनकर यांच्या आंबा बागेपर्यंत पोहोचली. काही क्षणातच आंब्याच्या बागेने भयंकर पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले आणि काही मिनिटांतच संपूर्ण बाग जळून खाक झाली. या आगीत झाडांसाठी बसवलेली पाणीपुरवठा व्यवस्था, फिनोलेक्स कंपनीचे पाइप तसेच स्प्रिंकलर संचही जळून नष्ट झाले. अतिशय कष्टाने उभी केलेली ही बाग नुकतीच फळधारणेच्या अवस्थेत होती. त्यामुळे या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीनंतर पुन्हा आगीत नुकसान
यापूर्वी अतिवृष्टी व ढगफुटीमुळेही शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले होते. सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर कर्जाचा भार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जनजागृतीची गरज व्यक्त केली जात आहे.
बाईट :
“मी तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत एक हेक्टर आंबा फळबाग लागवड केली होती. अतिशय मेहनतीने बाग फुलवली होती. यावर्षी चांगले फळधारणाही झाली होती. मात्र शेजारील शेतातील गव्हाच्या काडाला लागलेल्या आगीमुळे माझी संपूर्ण बाग जळून खाक झाली. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. या घटनेत माझे अंदाजे १० ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन मदत करावी,” अशी प्रतिक्रिया शेतकरी सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांनी व्यक्त केली.