-माऊली मंदिर उभारणीसाठी राज्यभरातून भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : श्री क्षेत्र भगवानगड येथे उभारण्यात येत असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य मंदिरासाठी राज्यभरातून देणग्यांचा ओघ सुरू असून, जालना जिल्ह्यातील पानेगाव ग्रामस्थांनी तब्बल १ कोटी २६ लाख रुपयांची देणगी जाहीर करून भक्तीभावाचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे.
मंदिर उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून, या कार्यासाठी गावागावांतून भाविक मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत आहेत. अनेक गावांनी आपापल्या देणग्या जाहीर करून त्या मठाधिपती डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. पानेगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे मठाधिपतींच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी एकत्र येत देणगी जाहीर केली. गावातील प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान देत एकूण रक्कम १ कोटी २६ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. या उपक्रमामुळे संपूर्ण गावात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या ग्रामस्थांकडूनही देणग्या येणे बाकी असून, ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, माऊलींच्या भव्य मंदिर उभारणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहकार्य करत असून, या ऐतिहासिक उपक्रमात सर्वांनी सढळ हस्ते योगदान द्यावे, असे आवाहन भगवानगड ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.