चिखली/बुलढाणा (बाळू वानखेडे) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आज एकच मोठा राजकीय महास्फोट झाला. भाजपच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत भाजप, उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडीला धोबीपछाड दिली आहे. शेकडो आजी-माजी पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’ जनसंपर्क कार्यालयात भगवा हाती घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, उदयनगरचे (उंद्री) सरपंच मनोज लाहुडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे चिखलीतील स्थानिक गणिते पूर्णतः बदलली आहेत. हा प्रवेश म्हणजे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यापेक्षा विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणाऱ्या भाजपला आता शिवसेनेच्या या वाढत्या ताकदीचा सामना करावा लागणार आहे.
“हा तर नुसता ट्रेलर, पिक्चर अजून बाकी!” “चिखलीतील जनतेचा शिवसेनेवरचा विश्वास या गर्दीतून दिसत आहे. कोणत्याही दबावाशिवाय स्वखुशीने हे सर्व शिलेदार सामील झाले आहेत. सामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळात चिखलीचा गड अधिक भक्कम होईल,” असा विश्वास आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रमुख गावांतून झाले प्रवेश:
-
उदयनगर (उंद्री): सरपंच मनोज लाहुडकर, अक्षय कारंडे, रोहन कारंडे यांच्यासह पदाधिकारी.
-
पांगरखेड: भाजप व्यापारी आघाडीचे तालुकाप्रमुख राजाराम पिंपळे यांच्यासह मोठा गट.
-
केळवद: शिवसेना (ठाकरे) शाखाप्रमुख विनोद ठेंग यांच्यासह शिवसैनिकांचा प्रवेश.
-
इतर गावे: शिंदेहराळी, सोयगाव, शेलुद, ढालसावंगी, दहिद खुर्द, देवपूर, करणखेड, पेठ आणि बोरगाव काकडे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.
चिखलीत ‘भगवी लाट’; राजकीय समिकरणे बदलणार!
या ऐतिहासिक सोहळ्याला शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, खासदार प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, शहरप्रमुख आशिष जाधव यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. या पक्षप्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पारडे जड झाले असून, आगामी काळात महायुतीच्या अंतर्गत राजकारणात शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमालीची वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.