–व्यापारी-ग्राहकांची तारांबळ; गावात अनेक ठिकाणी मोहळ, तातडीने बंदोबस्ताची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात आग्या मोहळाने धुमाकूळ घालत व्यापारी व ग्राहकांमध्ये मोठी घबराट निर्माण केली. या हल्ल्यात सुमारे १५ ते २० नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. ही घटना २० मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. आज आठवडी बाजार असल्याने व्यापारी दुकाने मांडून ग्राहकांची वर्दळ सुरू असतानाच बाजारातील एका मोठ्या झाडावरील आग्या मोहळ अचानक उठले. काही समजण्याच्या आतच माशांनी अनेकांना दंश केल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. व्यापारी व ग्राहक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या प्रकारात अनेक जण जखमी झाले.
दरम्यान, १९ मार्च रोजीही दि. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा साखरखेर्डा येथील गच्चीवरील आग्या मोहळ उठल्याने एका वयोवृद्ध व्यक्तीवर हल्ला झाला होता. झिने नावाचे व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांच्या अंगावर चादर टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. साखरखेर्डा गावात अनेक ठिकाणी आग्या मोहळ आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन मोहळांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.