-पिकांचे मोठे नुकसान; पंचनामे करून भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून नुकसानभरपाईची मागणी जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने परिसर अक्षरशः झोडपून काढला. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने कांदा, गहू तसेच इतर पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही वेळातच झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले, तर नागरिकांचीही तारांबळ उडाली. वझर आघाव, कासारी, येवती, चिंचोली सांगळे, पारडा दराडे, देऊळगाव कुंडपाळ, खुरमपूर, अजिसपुर, धायफळ या भागांत गारपीट व अवकाळी पावसाचा विशेष फटका बसल्याची माहिती आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, उबाठा शिवसेना तालुका अध्यक्ष राजुभाऊ बुधवत यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तहसीलदार, बीडीओ, तलाठी व ग्रामसेवक यांना त्वरित घटनास्थळी पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र मोठी भर पडली आहे. आता शासनाने तातडीने मदतीचा हात देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.