–माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची उपस्थिती; हिंदू–मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील जामा (दगडी) मस्जिद येथे रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. १८ मार्च रोजी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत हिंदू–मुस्लिम बांधवांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश दिला.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजा (उपवास) पाळून अल्लाहची प्रार्थना केली जाते. या पार्श्वभूमीवर सायंकाळी रोजा सोडताना आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, “ईद हा सण राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्वाची शिकवण देणारा आहे. प्रत्येकाने आपले सण-उत्सव साजरे करताना एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा जपला पाहिजे. यामुळे समाजात बंधुभाव अधिक दृढ होतो.” तसेच साखरखेर्डा गावाशी असलेले जुने संबंध जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केले होते. यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजू ठोके, माजी सरपंच कमलाकर गवई, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, आयुबसेठ कुरेशी, सय्यद रफीक, देवानंद खंडागळे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मंडळकर, शिवाजी जाधव, ठाणेदार गजानन करेवाड यांच्यासह असंख्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची पाहणीही डॉ. शिंगणे यांनी केली. इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने साखरखेर्ड्यात सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.