–उपचारासाठी उशीर झाल्याचा आरोप; मद्यधुंद अवस्थेची चर्चा, पोलिस तपास सुरू
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे धावत्या ट्रॅक्टरवरून पडून भुमराळा येथील समाधान विठोबा दळवी (वय ३५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुमराळा येथून विनानंबर नवीन फार्मट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर पेन सांगवीकडे चारा घेऊन जात होता. पंडित नेहरू विद्यालयासमोरील पुलाजवळ ट्रॅक्टरवर चालकाच्या बाजूला उभे असलेले समाधान दळवी यांचा अचानक तोल जाऊन ते खाली पडले. यावेळी ते ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर चालक किशोर टेकाळे व इतर सोबत्यांनी तत्काळ मदत न करता केवळ पाहत राहिल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे. जखमी अवस्थेत पडलेल्या दळवी यांना रुग्णालयात हलविण्यास विलंब झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांना उशिरा बीबी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, ट्रॅक्टरवरील काहीजण मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. या घटनेप्रकरणी बीट जमादार निवृत्ती पोफळे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठविला आहे. उत्तरीय तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.