-रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान महोत्सवात सुमारे ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध स्पर्धा व मार्गदर्शन सत्रे उत्साहात पार पडली
लोणार (वाजिद खान) : लोणार येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात नववे राष्ट्रीय स्तरावरील लोणार विज्ञान महोत्सव ६ मार्च रोजी उत्साहात पार पडला. यावर्षी महाविद्यालयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे या विज्ञान महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार आणि कै. कमलाबाई क. बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, आर. ए. महाविद्यालय वाशिम, विवेकानंद महाविद्यालय हिवरा आश्रम तसेच डॉ. पंडित विद्यासागर फाउंडेशन, पुणे यांचे सहकार्य लाभले. लोणार विज्ञान महोत्सवाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या उत्साहात विज्ञान ज्योत रॅली व ग्रंथदिंडीने करण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून शिवाजी शिक्षण संस्था लोणारचे सचिव प्रकाशभाऊ मापारी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. केसरीलाल वर्मा (कुलगुरू, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल), प्रा. डॉ. प्रदीप खेडकर (राष्ट्रीय सचिव व प्रांताध्यक्ष, अखिल भारतीय शैक्षणिक महासंघ), प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू, सचिव डॉ. संतोष बनमेरू, राजूभाऊ मापारी, लोणार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सदगीर साहेब, प्राचार्य डॉ. ओमराज गजभिये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विज्ञान रॅलीचे विसर्जन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर लेझीमच्या सादरीकरणाने करण्यात आले. त्यानंतर विज्ञान ज्योत महोत्सव समन्वयकांकडे सुपूर्द करण्यात आली आणि उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृत सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषाताई गोले होत्या. प्रमुख अतिथींमध्ये प्राचार्य डॉ. विजय नागरे, प्राचार्य डॉ. मीना निकम, प्राचार्य डॉ. ओमराज गजभिये, प्रा. बळीराम मापारी, डॉ. संतोष बनमेरू, रमेश बनमेरू, भिकमचंद रेदासनी, शुभम बनमेरू, प्रशांत बनमेरू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महोत्सवाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी केले. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने हा विज्ञान महोत्सव सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. केसरीलाल वर्मा यांनी आपल्या भाषणात लोणार विज्ञान महोत्सव हा लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री आयुष मंत्रालय भारत सरकारचे प्रतापराव जाधव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत लोणार सरोवर संवर्धनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले. तसेच डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यार्थ्यांना लोणार सरोवराची जैवविविधता व त्याचे वैज्ञानिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दैनिक सह्याद्रीचा राखणदारच्या विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्राचार्य डॉ. मीना निकम, प्राचार्य डॉ. विजय नागरे, प्रा. बळीराम मापारी आणि प्रा. डॉ. प्रदीप खेडकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन व लोणार सरोवर संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. उषाताई गोले यांनी विज्ञान क्षेत्रातील संधींचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे आवाहन केले. या महोत्सवात वैज्ञानिक मॉडेल प्रदर्शन, पोस्टर सादरीकरण, विज्ञान प्रतिभा प्रश्नमंजुषा, स्पॉट पेंटिंग, पुष्परचना आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. “लोणार सरोवर संवर्धन” आणि “विज्ञान व तंत्रज्ञान” हे या वर्षाचे प्रमुख विषय होते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.
यानंतर बक्षीस वितरण व निरोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष बनमेरू होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदूभाऊ मापारी, लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मीराताई मापारी, प्राचार्य डॉ. ओमराज गजभिये व समन्वयक डॉ. सूर्यकांत बोरुळ उपस्थित होते. विज्ञान प्रतिभा प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. अश्मिरा अनम शेख अख्तर (आर. एन. लाहोटी इन्स्टिट्यूट, सुलतानपूर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. वैज्ञानिक पोस्टर स्पर्धेत कु. श्वेता अंभोरे (विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, हिवरा आश्रम) प्रथम ठरल्या. वैज्ञानिक मॉडेल स्पर्धेत कृष्णा जाधव (आर. ए. कॉलेज वाशिम) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पॉट पेंटिंग स्पर्धेत कामन्ना मोहित (स्कूल ऑफ फार्मसी, नांदेड) प्रथम आले. पुष्पगुच्छ रचना स्पर्धेत कु. सलोनी मारोठे (कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार) प्रथम ठरल्या.
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्रे आणि पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या विज्ञान महोत्सवात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत विविध महाविद्यालयांमधील सुमारे सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेंद्र भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सौरभ गायकवाड यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.