– प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय
लोणार (वाजिद खान) : प्रवाशी सेवा संघटना, लोणार यांच्या मागणीनुसार जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ लोणार मार्गे हिंगणघाट आगाराची हिंगणघाट–छत्रपती संभाजीनगर ही नवी बसफेरी सोमवार, दि. ९ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या वारंवार होणाऱ्या मागणीनुसार ही बसफेरी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सदर बसफेरी हिंगणघाट येथून सकाळी ७.४५ वाजता सुटून वर्धा, यवतमाळ, दिग्रस, आर्णी, पुसद, अनसिंग, वाशिम, रिठद, रिसोड, भर, मोप, लोणी, लोणार, सुलतानपूर, बिबी, दुसरबीड, किंनगावराजा, सिंदखेडराजा, नाव्हा आणि जालना मार्गे रात्री १० वाजता सिडको (छत्रपती संभाजीनगर) येथे मुक्कामी पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सिडको (छत्रपती संभाजीनगर) बसस्थानक येथून सकाळी ८ वाजता ही बसफेरी हिंगणघाटकडे सुटून रात्री १० वाजता हिंगणघाट येथे पोहोचेल.
लोणार, रिसोड आणि वाशिम या तीन शहरांतून हिंगणघाटकडे जाणारी ही एकमेव बसफेरी असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही बसफेरी सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर केल्याबद्दल नितीन मैंद (महाव्यवस्थापक, वाहतूक, मुंबई), श्रीकांत गभणे (प्रादेशिक व्यवस्थापक, नागपूर), भगवान जगणोर (विभाग नियंत्रक, वर्धा), स्वाती तांबे (विभागीय वाहतूक अधिकारी, वर्धा) आणि गौतम शेंडे (आगार व्यवस्थापक, हिंगणघाट) यांचे प्रवाशी सेवा संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
प्रवाशी सेवा संघटनेचे अध्यक्ष उस्मान शेख, सचिव भागवत खरात आणि उपाध्यक्ष अशोक काटकर यांनी प्रवासी, पर्यटक, व्यापारी, रुग्ण, भक्तगण आणि विद्यार्थ्यांनी या बसफेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.