-आळंदी संस्थान कमिटीचे निवेदन; मंदिरात सत्कारामुळेही चर्चा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आचार्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकाराम’ या राष्ट्रीय परिषदेत केलेल्या कथित विधानावरून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम यांच्या ग्रंथांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक व सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
संस्थान कमिटीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत आणि मराठी भाषेत साकारलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ अत्यंत सहज, सुंदर, रसाळ आणि अलंकारिक भाषेत लिहिलेला असून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा आधार आहे. भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.
ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात संत ज्ञानेश्वरांनी स्वतः ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले असून “माझा आत्माराम बोली, माणसांमध्ये मिसे | वर्णिला शांतेशी तो हा ग्रंथु ||” या ओवीद्वारे ग्रंथाचे स्वरूप स्पष्ट केले असल्याचेही संस्थानने नमूद केले. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा केवळ भाष्य नसून स्वतंत्र आणि प्रगल्भ ग्रंथ रचना असल्याचे संस्थान कमिटीने स्पष्ट केले आहे. स्वामी गोविंददेवगिरी यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही असहमत असून त्याचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच संबंधितांनी संत परंपरेचा आदर राखत आपले वक्तव्य मागे घ्यावे व संतांची क्षमा मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ गुरुशांतिनाथ, चैतन्य केशवराव लोंढे, अॅड. रोहिणी पवार आणि पुरुषोत्तम पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निषेधानंतर मंदिरात सत्कार
या प्रकरणावरून वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत असताना देहू येथेही विरोध नोंदविण्यात आला. मात्र आळंदी येथे सकाळी निषेध व्यक्त केल्यानंतर दुपारी आचार्य गोविंददेवगिरी यांचा आळंदी देवस्थानतर्फे सत्कार करण्यात आल्याने या घटनेची अधिक चर्चा रंगली.
आचार्य गोविंददेवगिरी महाराज यांनी माउली मंदिरात येऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले, मंदिर प्रदक्षिणा केली आणि सुवर्णपिंपळ परिसरातून बाहेर पडताना साष्टांग दंडवत घातले. या वेळी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वातावरण तणावपूर्ण असल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान, मंदिरात त्यांनी पत्रकारांशी संवाद न साधता तेथून मार्गस्थ झाल्याची माहिती मिळाली.
वारकरी संप्रदायात संताप
संत ग्रंथसंपदेविषयी केलेल्या कथित वक्तव्यांमुळे वारकरी संप्रदाय, संत-महंत आणि भाविकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरही अनेक महाराज व जाणकारांनी या विधानाचा निषेध नोंदवला. एका बाजूला जाहीर निषेध आणि दुसऱ्या बाजूला मंदिरात सत्कार झाल्याने आळंदी देवस्थानही चर्चेत आले असून अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
गोविंददेवगिरी यांची दिलगिरी
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आचार्य गोविंददेवगिरी महाराज यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. “माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो,” असे त्यांनी सांगत संबंधित शब्द मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आळंदीच्या पवित्रतेचे जतन करण्यासाठी आवश्यक तेव्हा निस्वार्थ सेवा करू, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणामुळे निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण काहीसे निवळले असले तरी वारकरी संप्रदायात या विषयावर चर्चा सुरूच आहे.