-पासबुक नसल्याने पैसे ट्रान्स्फर नाकारल्याची घटना; आरबीआयकडे तक्रारीचा इशारा
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : तालुक्यातील किनगाव राजा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत ५ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घडलेल्या प्रकारामुळे ग्राहक सेवेला धक्का बसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. पासबुक नसल्यास खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करता येणार नाही, असा नियम सांगत कॅशिअरने व्यवहार करण्यास नकार दिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
निमगाव वायाळ येथील पत्रकार सुरेश हुसे हे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी बँकेत गेले होते. त्यावेळी संबंधित कॅशिअरने “पासबुक आणा, नाहीतर पैसे ट्रान्स्फर होणार नाहीत. थंबने पैसे काढा,” असे सांगत व्यवहार करण्यास नकार दिला.
मात्र काही वेळाने शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हस्तक्षेप करत आधार कार्ड लिंक असल्यास व्यवहार करता येतो, असे स्पष्ट केले. त्यानंतर संबंधित रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आली. या घटनेमुळे शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका ग्राहकांकडून होत आहे.
एटीएममध्ये कायम रोख रकमेचा तुटवडा
दरम्यान, शाखेबाहेरील एटीएममध्ये नेहमीच रोख रक्कम उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, जेष्ठ नागरिक आणि महिलांना पैसे काढण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे सांगितले जात आहे.
आरबीआय व झोनल कार्यालयाकडे तक्रार
या संपूर्ण प्रकाराबाबत आपण लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक तसेच अकोला येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजर कार्यालयाकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरेश हुसे यांनी दिली. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चौकशीची मागणी
राष्ट्रीयीकृत बँकेत अशा प्रकारे ग्राहकांची अडवणूक होत असल्यास सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा, असा प्रश्न आता किनगाव राजा परिसरात उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा काही नागरिकांनी दिला आहे.
या प्रकरणाची दखल आरबीआय व झोनल कार्यालय घेणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.