-साखरखेर्डा जिल्हा परिषद गटात निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा जिल्हा परिषद गटाच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर यांनी मुंबई येथे शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साखरखेर्डा जिल्हा परिषद गटासाठी शुभेच्छा दिल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे.
मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर डॉ. भाग्यश्री खेडेकर यांच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. साखरखेर्डा जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून या गटातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक नवे चेहरे पुढे येत आहेत.
दरम्यान, आरक्षण मर्यादेच्या प्रकरणामुळे बुलढाणा जिल्हा परिषदेसह राज्यातील २२ जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आरक्षणाची मर्यादा निश्चित झाल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुका कधी होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सुनेने, डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी गटातील प्रत्येक गावात जाऊन जनसंपर्क वाढविला आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातून योगेश जाधव यांनीही जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकाच गटात दोन प्रबळ दावेदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी अमृता योगेश जाधव यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे रामभाऊ जाधव यांचा घराघर संपर्क मजबूत असून ते यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. भाजपकडून निताताई उल्हास देशपांडे यांच्याही हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आपल्या कार्यकाळात साखरखेर्डा भागात विविध विकासकामे केल्याचा उल्लेख करत नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी डॉ. भाग्यश्री खेडेकर यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांनी पूर्वतयारी सुरू केली असून, साखरखेर्डा गटात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.