-‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा; देहू–आळंदी–चऱ्होलीत इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान
आळंदी (अर्जुन मेदनकर) : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयीची संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प आकार घेतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या भावनेतून संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचा चौथा टप्पा रविवारी (दि. २२) सकाळी ८ ते ११ या वेळेत राबविण्यात येणार आहे. परम श्रद्धेय निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील सुमारे १५०० ठिकाणी एकाच वेळी हे स्वच्छता अभियान पार पडणार आहे.
या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी आणि आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा एकूण ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, देशव्यापी पातळीवर आयोजित हा उपक्रम जलसंधारण व स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजात पोहोचविणारा ठरणार आहे. पाणी हे केवळ साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे. त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, ही जाणीव समाजात निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने सदगुरु बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणीने प्रेरित होऊन सन २०२३ मध्ये भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली. जलसंवर्धन हा केवळ एकदिवसीय कार्यक्रम नसून तो जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.
नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी आणि झरे यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित या जनआंदोलनाने पहिल्या तीन टप्प्यांत सेवा व सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. त्या यशाच्या प्रेरणेने चौथा टप्पा अधिक व्यापक आणि संघटित स्वरूपात राबविला जात असून समाजात निसर्गाबद्दल जागरूकता व सहभागाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेदरम्यान समूह गायन, जनजागृती चर्चासत्रे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जलजन्य आजार व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. “जेव्हा मन निर्मळ असते तेव्हाच निसर्ग स्वच्छ राहतो” या संदेशाला अधोरेखित करत समाजपरिवर्तनाची दिशा देण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे.
सतगुरु माताजींचा संदेश आहे की, पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त रूप ठरत आहे. या स्वच्छता अभियानात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले असून आळंदी परिसरातील विविध सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.