-उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या पथकाची संयुक्त कारवाई
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : पोलीस स्टेशन हद्दीतील पांग्रीकाटे येथील दोन शेतकऱ्यांनी शेतामध्ये अफू (खसखस) पिकाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १ कोटी ३२ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीची १६४ किलो ९८० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संतोष खाडे (उपविभागीय पोलिस अधिकारी), सिंदखेडराजा येथील नायब तहसीलदार संदीप बंगाळे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निबंधक आनंद शिंदे हे साखरखेर्डा, गोरेगाव व पांग्रीकाटे परिसरात पाहणी करत असताना पांग्रीकाटे येथील गट क्रमांक १४८ मधील भागवत सदाशिव काटे व गट क्रमांक १२८ मधील विशाल रमेश काटे यांनी अफूची लागवड केल्याची माहिती मिळाली. संयुक्त पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता भागवत काटे हे अफूच्या पिकाला पाणी देताना आढळून आले. त्यांच्या शेतातून उपटून जमा करण्यात आलेल्या अफूचे वजन १०७ किलो ६६० ग्रॅम असून त्याची बाजारमूल्ये सुमारे ८६ लाख १२ हजार ८०० रुपये इतकी आहे. तर विशाल रमेश काटे यांच्या शेतातून ५७ किलो ३२० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत अंदाजे ४५ लाख ८५ हजार ६०० रुपये आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाणेदार गजानन करेवाड, नायब तहसीलदार संदीप बंगाळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आनंद शिंदे, ग्राम महसूल अधिकारी आनंद राजपूत, कृषी सहाय्यक छबुलाल कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोलीस हेड कॉन्स्टेबल डिगांबर चव्हाण, सुनील देशमुख, उमेश घुगे, किशोर बोरे, आकाश काळदाते तसेच चालक सलीम गवळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), १८(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.