-सहदेव लाड यांच्या गाडीच्या डिझेलसाठी शेतकऱ्यांकडून चार हजार रुपयांची लोकवर्गणी
लोणार (ऋषी दंदाले) : सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील शेतकऱ्यांनी शेतकरी चळवळ अधिक बळकट व्हावी या उद्देशाने पुढाकार घेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांना त्यांच्या वाहनाच्या डिझेलसाठी लोकवर्गणी स्वरूपात चार हजार रुपये दिले आहेत.
देवखेड येथील गोरगरीब शेतकऱ्यांनी कोणी ५० तर कोणी १०० रुपये देत स्वखुशीने ही रक्कम जमा केली. गावातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने धावपळ करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, या भावनेतून ही मदत करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. देवखेड परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा नदी पात्रावरील अपुऱ्या पुलामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. नदीच्या पलीकडे जाण्यासाठी काही काळ शेतकऱ्यांना पाण्यावरून थर्माकोलच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. सप्टेंबर महिन्यात या समस्येबाबत शेतकऱ्यांनी सहदेव लाड यांच्याकडे व्यथा मांडल्या होत्या.
त्यावेळी शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सहदेव लाड यांनी पुलावरून उडी मारून जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अपुऱ्या पुलाच्या कामाजवळ शेतकऱ्यांसाठी शिडी तयार करून तात्पुरता पर्याय रस्ता उपलब्ध करून दिला. या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आपणही आर्थिक स्वरूपात हातभार लावावा, या भावनेतून देवखेड येथील शेतकऱ्यांनी चार हजार रुपयांची लोकवर्गणी करून सहदेव लाड यांच्या गाडीच्या डिझेलसाठी मदत केली. या उपक्रमामुळे परिसरात शेतकरी ऐक्याचे दर्शन घडले आहे.