-बुलढाण्यात संघटन बळकटीला वेग
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेगाव येथे १४ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार प्रकाश शिंदे यांची बुलढाणा जिल्हा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकाश शिंदे हे सध्या सिंदखेड राजा येथील भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक (सर्वेअर) पदावर कार्यरत असून त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आली आहे. संघटनेच्या कार्यासाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य व आर्थिक सहकार्य अशा पंचदानातून संघटना अधिक सक्षम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सभासदांच्या अडचणी, प्रश्न व हक्कांसाठी ठामपणे उभे राहून संघटनात्मक लढ्याला बळ देण्याचे आवाहन नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे. विभागीय अध्यक्ष गणेश सुरपाटणे तसेच जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र डोसे यांनी प्रकाश शिंदे यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संघटनेचे राज्य सचिव अभय पाटील यांनीही या नियुक्तीचे स्वागत करत प्रकाश शिंदे यांच्या माध्यमातून कर्मचारी प्रश्नांचा आवाज अधिक बुलंद होईल आणि संघटनेची ताकद राज्यभर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक संघटित, गतिमान व परिणामकारक होणार असून कर्मचारी हक्कांसाठीचा लढा नव्या जोमाने पुढे जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.