-जिजाऊ सृष्टीत ‘आपदा मित्रां’ना जीव वाचविण्याचे रणमैदानी प्रशिक्षण; पाण्यावर बोट व बचाव मोहिमांचे थरारक प्रात्यक्षिक
-तहसीलदार अजित दिवटे यांची धडक पाहणी; प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्याचे स्पष्ट निर्देश
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : सिंदखेडराजा तालुक्यातील जिजाऊ सृष्टी येथे प्रशासनाच्या पुढाकाराने सुरू असलेले ‘आपदा मित्र’ आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. ३ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कौशल्याचे प्रत्यक्ष सरावासह सखोल प्रशिक्षण दिले जात आहे.
मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून पुणे येथील “आयटस स्पोर्ट्स अॅण्ड सेफ्टी प्रा. लि. – इंडियन रेस्क्यू अकॅडमी” या नामांकित संस्थेमार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे आधुनिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील नोंदणीकृत सर्व आपदा मित्र या शिबिरात नियमितपणे सहभागी होत असून प्रशिक्षणात विशेष उत्साह दिसून येत आहे. आजच्या प्रशिक्षण सत्रात पूरस्थितीत बोट चालविण्याचे तंत्र, कमी साधनसामग्रीत तातडीची बोट तयार करण्याची पद्धत तसेच पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रत्यक्ष परिस्थिती निर्माण करून दिलेल्या या सरावामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये आत्मविश्वास वाढत असून आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी होत आहे. दिनांक ६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार अजित दिवटे यांनी प्रशिक्षणस्थळी अचानक भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली. त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली तसेच प्रशिक्षण अधिक काटेकोर, वास्तववादी आणि प्रभावी होण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. “आपत्ती येण्याआधीच आपण पूर्ण तयारीत असले पाहिजे,” असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला.
प्रशिक्षणार्थींसाठी निवास, चहा-नाश्ता आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आयोजक संस्थेमार्फत करण्यात आली असून प्रशासनाकडून त्यावर नियमित लक्ष ठेवले जात आहे. या प्रशिक्षणामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होत असून भविष्यातील कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होत आहे. आपत्तीसमोर हतबल न होता धैर्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उभे राहणारा सिंदखेडराजा तालुका आता सज्ज होत असल्याचे चित्र जिजाऊ सृष्टीतील या प्रशिक्षणातून स्पष्टपणे दिसून येत आहे.