-धोकादायक स्थितीत टाकलेले खांब – अपघाताला थेट निमंत्रण
-एखाद्याचा जीव गेल्यावरच महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का?
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : प्रशासकीय अनास्था आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे सध्या मेरा खुर्द परिसरात अक्षरशः मृत्यूचे सापळे रचले जात आहेत. महावितरण कंपनीअंतर्गत सौर ऊर्जेचे खांब उभारण्याचे काम सुरू असताना हे लोखंडी खांब थेट मुख्य रस्त्यावर बेदरकारपणे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रकार अपघाताला थेट निमंत्रण देणारा ठरत आहे. या गंभीर आणि जीवघेण्या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, कार्यकारी अभियंत्यांनी “आम्हाला काहीच माहिती नाही” असे बेजबाबदार उत्तर देत हात झटकले. उद्या एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल आता जनतेकडून उपस्थित होत आहे.
देऊळगाव घुबे–मलगी, देऊळगाव घुबे–भरोसा तसेच मेरा खुर्द–चिखली हे तीनही अत्यंत महत्त्वाचे रस्ते असून या मार्गांवर सौर ऊर्जेचे खांब उभारणे व तार ओढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामात सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. लोखंडी खांब रस्त्याच्या मधोमध तसेच कडेला अस्ताव्यस्त टाकण्यात आले असून रात्रीच्या वेळी हेच खांब वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. या संदर्भात कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी “आमच्या कार्यालयाला या कामाची कोणतीही माहिती नाही,” असे सांगत सर्वे रिपोर्ट देण्यास टाळाटाळ केली. आपल्या विभागातील कामाचीच माहिती नसलेले हे कसले कार्यकारी अभियंते, असा संतप्त सूर आता संपूर्ण परिसरात उमटत आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या कामासाठी आमच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही आणि रस्त्याच्या कडेला खांब टाकल्यास मोठे अपघात होण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट मत मांडत बांधकाम विभागाने मुख्य कार्यकारी अभियंता तसेच बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवले आहे. शासकीय विभागच जर एकमेकांकडे बोट दाखवत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यावर पडलेल्या या धोकादायक अडथळ्यांमुळे उद्या एखादा भीषण अपघात होऊन एखादे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तर त्याची जबाबदारी कोणाच्या माथी जाणार, असा थेट सवाल मेरा खुर्द परिसरातील नागरिक करत आहेत. नियम पायदळी तुडवणारे कंत्राटदार आणि बेजबाबदार अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होणार की प्रशासन अजून एखाद्या बळीची वाट पाहत आहे, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.