-दुसऱ्यांच्या मुलींचे कन्यादान करणारे, सरळ हाताने मदत करणारे ‘सावकार’ म्हणून पंचक्रोशीत ख्याती
साखरखेर्डा (वार्ताहर): राजकारण हा पिंड नसतानाही लोकाग्रहास्तव सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेत आयुष्यात एकदाही निवडणूक न हरता तब्बल आठ वेळा ग्रामपंचायत सदस्य व सलग दहा वर्षे सरपंचपद भूषवणारे गोरेगाव येथील माजी सरपंच रामदास पंचाळ यांचे गुरुवार, ३० जानेवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.
गोरेगाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून रामदास पंचाळ यांची ओळख होती. ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका घेतली. गावातील कोणत्याही मुलीचे लग्न ठरविताना त्यांचा आवर्जून सल्ला व सहभाग घेतला जात असे. पैशाअभावी लग्न मोडत असल्यास वधूच्या पित्याची भूमिका घेत त्यांनी स्वतःच्या मुलीसारखे समजून अनेक कन्यादान घडवून आणले. कष्टकरी वृत्ती, प्रामाणिक मेहनत व उत्कृष्ट शेतीच्या जोरावर त्यांनी सुमारे १०० एकर शेतीचे मालकत्व मिळवले. गावात सावकार म्हणून त्यांची विशेष ख्याती होती. त्यांच्या खिशात नेहमीच मोठी रक्कम असायची व गरजूंना तत्काळ मदत करणारी ‘चालती-बोलती बँक’ म्हणून त्यांची ओळख होती.
गेल्या काही काळापासून त्यांना मधुमेहाचा आजार जडला होता, तरीही शेती व ग्रामपंचायत यांच्याशी असलेले नाते त्यांनी शेवटपर्यंत जपले. निधनापर्यंत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी सौ. सिंधूबाई रामदास पंचाळ सध्या सरपंचपदावर कार्यरत असून त्यांनीही यापूर्वी दोन कार्यकाळ सरपंच म्हणून सेवा बजावली आहे. रामदास पंचाळ यांच्या आकस्मिक निधनामुळे गोरेगाव गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.