-ट्रॉफीऐवजी स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा देऊन संघांना आदरांजली
साखरखेर्डा (अशोक इंगळे): शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साखरखेर्डा येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचा समारोप गुरुवार, ३० जानेवारी रोजी पार पडला. अंतिम सामना प्रहार संघ साखरखेर्डा आणि संविधान इलेव्हन जळगाव जामोद यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना प्रहार संघाने एकतर्फी जिंकत प्रथम क्रमांक पटकावला.
प्रहार संघाला शिवसेना युवा नेते योगेश जाधव यांच्या वतीने १ लाख १ हजार रुपये प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे ५१ हजार रुपये पारितोषिक माजी सरपंच महेंद्र पाटील यांच्या हस्ते संविधान इलेव्हन संघाला देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे ३१ हजार रुपये आयांश इलेव्हन साखरखेर्डा संघाला माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल यांच्या हस्ते देण्यात आले, तर चतुर्थ क्रमांकाचे २१ हजार रुपये राजे छत्रपती व बजरंग संघाने पटकावले. याशिवाय उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी व झेल यासाठी खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या बक्षीस वितरण समारंभाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, अमृता योगेश जाधव, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. मायाताई म्हस्के, माजी सरपंच सौ. पुनम महेंद्र पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, कमलाकर गवई, चंद्रशेखर शुक्ल, शिवसेना नेते गंभिरराव खरात, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनामुळे अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पारंपरिक ट्रॉफी न देता प्रत्येक संघाला स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा देऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन सुधीर ठाकूर, मंगेश राजपूत, विशाल गवई, सुनील रिंढे तसेच योगेश जाधव मित्रमंडळाने केले होते. यशस्वी आयोजनाबद्दल पंचक्रोशीतून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.