-प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध नोंदवला
चिखली (महेंद्र हिवाळे) : महाराष्ट्र राज्यातील जलसंधारण मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक २६/०१/२६ रोजी प्रजासत्ताक दिनी दिलेल्या भाषणात संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख जाणून-बुजून टाळल्याचे आढळले आहे. यामुळे बहुजन समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या मते, भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वामुळे भारताला संविधान प्राप्त झाले आहे. गिरीश महाजन यांनी भाषणात त्यांचा उल्लेख टाळणे म्हणजे बहुजन समाजाच्या अस्मितेला ठेस पोहोचवणे आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध नोंदवत, गिरीश महाजन यांना मंत्री पदावरून हटवण्याबाबत, आमदार पदावरून तात्काळ निलंबन करण्याबाबत तसेच त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायदा अंतर्गत कारवाई करण्याबाबत निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की बाबांचा अपमान हा फक्त बहुजनांचा नव्हे, तर भारतीय संविधानाचा देखील अपमान आहे. यावर तात्काळ कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील. निवेदनावर ता. अध्यक्ष संजय धुरंधर, ता. सचिव जितु निकाळजे, प्रदीप खंडारे, सुमित जाधव, राजु खंडारे, सागर आराख, गुलाबराव साळवे, मुकिंदा खरात, समाधान साळवे, राजु मोरे, दिपक साळवे, सतिश पैठणे, राहुल गवई, अमोल गवई, शरद भिसे, दत्तात्रय खरात, मनोज पवार, ईश्वर गायकवाड, ऍड. विजय वानखेडे, दिलीप इंगळे यांची स्वाक्षरी आहे.