– ‘देवेंद्र फडणवीस हेच भाजप-शिवसेना सरकारचे मुख्यमंत्री होतील’
– ‘बुलढाण्याचा पुढील खासदार भाजपच्या कमळचिन्हावरच द्यावा लागेल’
अकोला/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ‘येणार्या काळात देवेंद्र फडणवीस हेच भाजप-शिवसेना सरकारचे मुख्यमंत्री होतील’, अशा प्रकारचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. बावनकुळेंचे हे विधान शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जोरदार झटका मानला जात आहे. तर, बुलढाण्यात भाजपच्या बैठकीत बोलताना, ‘बुलढाण्याचा खासदार भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरच द्यावा लागेल’, असे वक्तव्य करून शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची त्यांची धाकधुक वाढवली आहे. म्हणजे, पुढील खासदारकी पाहिजे असेल तर आता प्रतापरावांना भाजपात प्रवेश घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत.
अकोला या पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस हे राज्याचेच नेतृत्व करणार असून, ते केंद्रात जाण्याचा प्रश्नच नाही. नजीकच्या काळात फडणवीस हेच भाजप-शिवसेना सरकारचे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या या वक्तव्याने, राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, शिंदे गटाच्या भुवया उंचावल्या आहेत. ब्राम्हण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून, फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर, फडणवीस हे केंद्रात शिफ्ट होतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना, बावनकुळे हे नकळतपणे खरे बोलून गेले. ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस हे कुठेही जाणार नाहीत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. येणार्या काळात भाजप-शिवसेना सरकारचे तेच मुख्यमंत्री बनतील. सद्या राज्याचे नेतृत्व फडणवीस हेच करत आहेत, आणि भविष्यातदेखील तेच राज्याचे नेतृत्व करतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, बावनकुळे हे पक्ष संघटना वाढीवर भर देत असून, त्यांचा विदर्भात दौरा सुरु आहे. अकोल्यानंतर ते बुलढाण्यात गेले. तेथेही त्यांनी, बुलढाण्याचा खासदार भाजपच्या कमळचिन्हावरच द्यावा लागेल, असे वक्तव्य करून शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची धाकधुक वाढवली. म्हणजे, खासदारकी पाहिजे असेल तर आता प्रतापरावांना भाजपात प्रवेश घ्यावा लागणार आहे. बुलढाण्यात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वात भारताचा विश्वगुरु बनण्याचा प्रवास सुरु आहे. मोदींचे व्हिजन भारताला जागतिक उंचीवर नेणारे आहेत. नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी २०२४च्या निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार भाजपच्या कमळ चिन्हावरच द्यावा लागेल. बुलढाण्यात बावनकुळे यांनी शहर-जिल्हा भाजप कार्यकारिणीची बैठकही घेतली.
प्रतापराव जाधव आता ‘कमळ’ हातात घेणार का?
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानाने शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर गंभीर राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे. २०२४साठीदेखील प्रतापराव हे तयारी करत आहेत. पुढील खासदारकी मिळणार असल्यानेच ते बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. सलग तिसर्यांचा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येत हॅटट्रीक करणारे प्रतापराव आता ‘कमळ’ हातात घेणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचे दोन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहेत. शिवसेनेतील बंडखोरीमुळे भाजपचे राजकीय वर्चस्व वाढलेले आहे. त्यामुळे पुन्हा निवडून यायचे असेल तर प्रतापराव जाधव यांना भाजपात गेल्याशिवाय पर्याय नाही, असा राजकीय सूरही आता उमटू लागला आहे.