-वारकरी परंपरा, कन्या पूजन आणि पंचपदी विधींमधून जपली धार्मिक संस्कृती
आळंदी (अर्जुन मेदनकर) : इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदा आरती, इंद्रायणी माता व नर्मदा माता नामजयघोष, वारकरी सांप्रदायिक भजन सेवा तसेच पंचपदी धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन करीत भक्तिभावात नर्मदा जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामुळे इंद्रायणी नदी घाटावर संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
या प्रसंगी दिनकर तांबे यांच्या हस्ते नर्मदा मातेच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यासोबतच कन्या पूजनही पार पडले. वारकरी सांप्रदायिक भजन, हरिनाम जयघोष आणि आरतीमुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमास रविंद्र महाराज कुमकर, दिलीप महाराज ठाकरे, इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे, अशोक महाराज सालपे यांच्यासह श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री मोहन महाराज शिंदे, संस्थेतील साधक वारकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच मोठ्या संख्येने वारकरी व भाविक उपस्थित होते.
यावेळी हरिनाम जयघोष मोठ्या उत्साहात करण्यात आला. भाविकांनी इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावर श्रद्धेने सहभाग नोंदविला.
संयोजक अर्जुन मेदनकर यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती व रथ सप्तमी हे धार्मिक उत्सव परंपरेने साजरे केले जात असून, या उपक्रमातून वारकरी परंपरा आणि धार्मिक संस्कृतीचे जतन होत आहे. या भक्तिमय सोहळ्यामुळे श्रद्धा, सेवा आणि सांप्रदायिक एकतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचला.