–सवडद येथील गणेश जयंती महोत्सवात प्रबोधन; महाप्रसादाने उत्सवाची सांगता
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : भगवंताने दिलेले ज्ञान व इंद्रिये मिळाल्यानंतर त्याचा गर्व न करता प्रपंचात राहूनही परमार्थ केला पाहिजे, तरच जीवन पूर्णतृप्त होते. आई-वडिलांच्या वाटण्याकरिता त्यांची अवहेलना करू नका; त्यांनी जसे तुम्हाला सांभाळले, तसेच त्यांनाही मायेने सांभाळा, असे मौलिक विचार तृतीय पंथीय किर्तनकार ह.भ.प. समा महाराज दौंडकर यांनी सवडद येथे आयोजित गणेश जयंती महोत्सवात व्यक्त केले.
सवडद येथे श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २१ जानेवारी रोजी रात्री ह.भ.प. समा महाराज दौंडकर यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी त्यांची डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. ‘लागोनिया पाया विनवितो तुम्हाला’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित किर्तनातून त्यांनी समाजप्रबोधन केले. तृतीय पंथीय आम्ही आहोत हे नाकारत नाही, मात्र समाजाने आमचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सांगितले की, आम्हाला प्रपंचाचा अधिकार नसला तरी परमार्थाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. समाजातील गुण-दोष हे परमेश्वराने निर्माण केले असून तोच या सृष्टीचा निर्माता आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा आम्हाला लाभला असून त्याच मार्गाने आम्ही चालत आलो आहोत, असे त्यांनी नमूद केले.
टोल नाक्यावर किंवा बाजारात टाळी वाजवून पैसे मागणाऱ्या तृतीय पंथीयांकडे माणुसकीने पाहावे, मदत झाली नाही तरी अवहेलना करू नये. प्रेमाने विचारपूस केली तर ते मायेने आशीर्वाद देतील, असे सांगत त्यांनी तृतीय पंथीयांच्या हक्कांसाठी शासनासोबत लढत राहणार असल्याचेही स्पष्ट केले. २० जानेवारी रोजी सकाळी ह.भ.प. अशोक महाराज घायाळ यांनी तीन दिवस गणेश पुराण कथा सादर केली. दुपारी मोफत वैद्यकीय व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. २१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंदारे यांचे ‘विद्यार्थ्यांचे कर्तव्य’ या विषयावर व्याख्यान झाले. तसेच पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन झाले.
२२ जानेवारी रोजी भरत महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. नेत्र तपासणी शिबिरातील ५० गरजू रुग्णांना डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर यांच्या वतीने चष्म्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास श्रीनिवास खेडेकर, युवासेना नेते योगेश जाधव, माजी सरपंच महेंद्र पाटील, तेजराव देशमुख, बाबूराव मोरे, संदीप मगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केले. उत्सव समितीच्या वतीने संतोष गाडेकर व ग्रामस्थांनी आयोजन केले. शेवटी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करून गणेश जयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली.