-वित्त आयोगाच्या निधीपासून ते पाणीपुरवठा योजनेपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित
साखरखेर्डा (वार्ताहर): गोरेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित आर्थिक अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील पाच युवकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
उपोषणकर्त्यांनी १५ वा वित्त आयोगाचा परिपूर्ण अहवाल, १४ वा वित्त आयोगाचा पासबुक स्टेटमेंट, सामान्य फंड व पाणीपुरवठा फंडातील जमा-खर्चाची माहिती, तसेच २०१६ ते २०२५ या कालावधीत घेतलेल्या ग्रामसभा व मासिक सभांचे कार्यवृत्त (प्रोसिडींग) सादर करण्याची मागणी केली आहे. यासोबतच साहित्य खरेदी ज्या दुकानदारांच्या नावाने दाखविण्यात आली आहे, त्या दुकानदारांचे जीएसटी क्रमांक व परवाने सादर करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. बांधकामांची बीले ज्या व्यक्ती किंवा ठेकेदारांच्या नावावर अदा करण्यात आली आहेत, ते शासकीय ठेकेदार असल्याचे पुरावे द्यावेत, तसेच नेहरू युवा मंडळाअंतर्गत मिळालेली व्यायामशाळा चोरीला गेल्याचा प्रकार असून ती शोधून देण्यात यावी, अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे. याशिवाय मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या खर्चाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी नितीन रमेश पंचाळ, जीवन गजानन पंचाळ, गजानन डी. पंचाळ आणि अमोल संजय पंचाळ या युवकांनी १९ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यापूर्वीही १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान त्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते; मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल घेत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश्वर पवार, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल, ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड व अविनाश नागरे यांनी मागितलेली कागदपत्रे सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत कोणतेही दस्तऐवज स्वीकारणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. दरम्यान, १८ जानेवारी रोजी उपोषण मंडप उभारण्यावरून ग्रामपंचायत कर्मचारी व उपोषणकर्त्यांमध्ये वाद झाला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ठाणेदार गजानन करेवाड यांनी हस्तक्षेप करत प्रकरण समजूतदारपणे मिटवले.
गावातील वातावरण तणावपूर्ण होत असताना प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी सरपंच भिकाजी पंचाळ यांनी केली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आल्याने, त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी दिली आहे.