-शहरात सकाळीच भीतीचे वातावरण, नागरिकांमध्ये दहशत
वर्धा (प्रकाश कथले): आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आर्वी येथील मासळी बाजार परिसरात अर्धनग्न अवस्थेत असलेल्या एका मनोरुग्ण युवकाने धुमाकूळ घालत हातातील लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या घटनेत एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. अखेर नागरिकांनी धैर्य दाखवत आरोपीला पकडून काठीला बांधून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ७५ वर्षीय वृद्धाचे नाव संजय वसंतराव राऊत असे असून ते या परिसरात पाहुणे म्हणून आले होते. हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव मथुरेश उर्फ मनेश गजानन लाडके (वय २२, रा. नेताजी वॉर्ड, आर्वी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेश याने प्रथम आपल्या घरी आजीसोबत भांडण करून तिला मारहाण केली. त्यानंतर हातात लाकडी दांडा घेऊन तो घराबाहेर पडला. रस्त्यात त्याने एका लहान मुलाला उचलून जमिनीवर आपटले. त्यानंतर रस्त्याने जात असलेल्या वृद्धावर डोक्यावर दांड्याने जोरदार वार केला. या हल्ल्यात वृद्धाचा मेंदू बाहेर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी भाजी बाजार परिसरात गेला, तेथेही त्याने एका व्यक्तीस मारहाण करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून त्याचे हात-पाय बांधून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून नागरिक मोठ्या प्रमाणावर पळापळ करताना दिसून आले. या हल्ल्यात रामरावजी महादेवराव वांगे (वय ८५, रा. मारुती वॉर्ड, आर्वी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना वर्धा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच शहजाद (ताज बेकरी) हा युवक किरकोळ जखमी झाला आहे. पोलिसांनी मथुरेश उर्फ मनेश गजानन लाडके याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.