-ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संस्कारांचे नवे दालन खुले
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या बंदिस्त प्रेक्षागृहाचे (इनडोअर स्टेडियम) भव्य उद्घाटन शनिवार, दि. १७ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष मा. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी गृहराज्यमंत्री तसेच संसदीय कामकाज व कायदा मंत्री मा. डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडरावजी घुबे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील थुट्टे, बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, फूड प्रोसेसिंग कंपनीचे संचालक राजीव जावळे, चिखली पंचायत समितीचे माजी उपसभापती भानुदास घुबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश येडुजी घुबे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश भुतेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गजानन घुबे, दिनकरराव घुबे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई घुबे, सचिव प्रा. उद्धवराव घुबे, संचालक डॉ. पुरुषोत्तम देवकर, तंटामुक्ती अध्यक्ष पंजाब घुबे आदी मान्यवरांचा समावेश होता.
मान्यवरांचे विद्यालयाच्या प्रांगणात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते इनडोअर स्टेडियमच्या फलकाचे अनावरण व फीत कापून विधिवत उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन गटविकास अधिकारी म्हणून निवड झालेल्या जानकीदेवी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर रामसिंग पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू कु. प्रियंका घुबे, पूजा बद्रीनाथ घुबे, आरती बद्रीनाथ घुबे, ऋतुजा अनंता घुबे, पूजा अनंता घुबे, आरती अनंता घुबे तसेच विभागस्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या मैदानी फुटबॉल व व्हॉलीबॉल खेळाडू व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात शेणफडरावजी घुबे यांनी संस्थेची वाटचाल मांडत, कठोर परिश्रमातून हे बंदिस्त प्रेक्षागृह पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. उद्घाटक डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या आशीर्वादाने शेणफडराव घुबे यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व क्रीडाक्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याचे नमूद केले. ग्रामीण भागात सर्व सुविधायुक्त इनडोअर स्टेडियम उभे करून विद्यार्थ्यांसाठी नवे दालन खुले केल्याबद्दल त्यांनी घुबे यांचे कौतुक केले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी खेळातही प्रावीण्य मिळवावे, कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव कमी करण्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. मैदानी खेळांची जोपासना ही आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख अतिथी डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले की, राज्यात अनेक शाळांची पटसंख्या घटत असतानाही जानकीदेवी विद्यालयाने आपली विद्यार्थीसंख्या टिकवून ठेवली आहे, हे संस्थेचे व्यवस्थापन व शिक्षक विद्यार्थ्यांची किती काळजी घेतात याचे द्योतक आहे. या विद्यालयातून तालुका, जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत असून, योग्य शैक्षणिक वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांनी भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य हरीदास घुबे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अमोल घुबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.