-प्रा. संजय खडसे–डॉ. नीता खडसे यांच्या गायनाने सिंदखेडराजा मंत्रमुग्ध
सिंदखेड राजा (सुरेश हुसे) :छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ आणि राजमाता जिजाऊंचे माहेर, मातृतीर्थ म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये यंदाचा जिजाऊ जन्मोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. या पावन भूमीवर यंदा जयंती सोहळ्याला स्वरांची मोहक किनार लाभली. उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे आणि त्यांच्या पत्नी डॉ. नीता खडसे यांच्या सुमधुर व भावस्पर्शी गायनाने संपूर्ण सिंदखेड राजा भारावून गेला.
दरवर्षी १२ जानेवारी रोजी लाखो भाविक, शिवप्रेमी व पर्यटक जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येथे दाखल होतात. गेल्या काही वर्षांपासून तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून येथे ‘जिजाऊ गाथा’ हा भव्य सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहे. जिजाऊंचे मातृत्व, त्याग, शिवसंस्कार आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांचा सांस्कृतिक आविष्कार या कार्यक्रमातून सादर केला जातो. यंदाच्या कार्यक्रमात प्रा. संजय खडसे व डॉ. नीता खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, शिवनेरी गडावर बांधल तोरण, भूमी महाराष्ट्राची झाली पावन, जो बाळा जो रे जो, जाधवाची लेक अन् सून भोसल्याची, राजमाता विरमाता माय शिवबाजी, दोनच राजे इथे गाजले—एक रायगडावर, एक चवदार तळ्यावर अशी एकापेक्षा एक प्रेरणादायी गीते सादर करत उपस्थितांमध्ये शिवभक्ती, राष्ट्रभक्ती आणि संस्कारांची ऊर्जा संचारली. प्रशासनातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही कला, संस्कृती आणि समाजभान जपले गेले तर लोकशाही अधिक समृद्ध होते, याचे जिवंत उदाहरण खडसे दाम्पत्याने सादर केले. त्यांच्या स्वरांतून जिजाऊंच्या मातृत्वाचा, शिवसंस्कारांचा आणि राष्ट्रउभारणीच्या विचारांचा प्रभावी प्रत्यय उपस्थितांना अनुभवायला मिळाला.
शासन व प्रशासन ही लोकविकासाची महत्त्वाची साधने असून, या यंत्रणांना संवेदनशील आणि सुसंस्कृत नेतृत्व लाभल्यास सामाजिक–सांस्कृतिक विकासालाही नवे बळ मिळते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. प्रशासनाच्या पुढाकारातून जिजाऊ जन्मोत्सव अधिक अर्थपूर्ण, लोकाभिमुख आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी खडसे दाम्पत्याच्या गायनाला उभे राहून दाद दिली. अधिकारी केवळ फाइल्सपुरते मर्यादित नसून समाजाच्या सांस्कृतिक प्रवाहातही सक्रिय सहभाग घेऊ शकतात, असा ठाम संदेश या जन्मोत्सवातून मिळाला. सूर, संस्कार आणि सेवाभाव यांच्या संगमाने जिजाऊ जन्मोत्सवाने सिंदखेड राजामध्ये नवे चैतन्य निर्माण केले.