-३० डिसेंबर रोजी साखरखेर्ड्यात मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण
बिबी (ऋषी दंदाले) : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे शेतकरी पुत्र तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांना संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार ३० डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
दैनिक भारत संग्राम यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, वृक्षमित्र स्व. मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच समाजभूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसानिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कारासाठी निवड समितीने सहदेव लाड यांची निवड केली आहे. सहदेव लाड हे एका गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे येत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षांपासून शेतकरी प्रश्नांवर लढा देत आहेत. या कालावधीत त्यांनी अनेक आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, या आंदोलनांमधून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.
शेतकऱ्यांसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे आयोजक सचिन खंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. या निवडीमुळे शेतकरी प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.