-मोटारसायकल मॅकॅनिक म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय युवकाचा मृत्यू
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरात वास्तव्यास असलेल्या मोटारसायकल मॅकॅनिक युवकाने आत्महत्या केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. मृत युवकाचे नाव शाम जयराम अवचार (वय ३०) असे आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शाम अवचार हा साखरखेर्डा येथे मोटारसायकल दुरुस्तीचे काम करीत होता. हातात कौशल्य असल्याने त्याचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र मंगळवारी दुपारी तो अचानक साखरखेर्डा–लव्हाळा रस्त्यालगत माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल यांच्या शेतातील क्रिकेट खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोकळ्या जागेत गेला. तेथे लिंबाच्या झाडाला दोर बांधून त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी त्याला खाली उतरवून पाहिले असता तो मृत झाल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पीएसआय गणेश डोईफोडे व बिट जमादार बाजीराव खरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मयताचा मामेभाऊ विजय हरिभाऊ जावळे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.