-दोन दिवसांत बस सुरू न झाल्यास फाट्याफाट्यावर रास्तारोकोचा इशारा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : वारंवार नवीन बससेवा सुरू करण्यासाठी निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बुलढाणा आगार व्यवस्थापनाने उलट ५० वर्षांपासून सुरू असलेल्या बससेवा बंद करण्याचा सपाटा लावल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दोन दिवसांत बंद केलेल्या बससेवा पुन्हा सुरू न केल्यास प्रत्येक फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
बुलढाणा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने नागरिक, शासकीय कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच रुग्णांना नियमितपणे बुलढाणा येथे ये-जा करावी लागते. मात्र बुलढाणा–चिखली–मेरा चौकी–लहाना मेरा–अंत्रीखेडेकर–मोठा मेरा–शिंदी–साखरखेर्डा–शेंदुर्जन–मलकापूर पांग्रा–बिबी–किनगाव जट्टू या मार्गावरील सकाळची बुलढाणा ते वझर आघाव ही एस. टी. बस गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. या बसद्वारे पोस्ट व टपाल पार्सलची वाहतूकही होत होती. सकाळी सात वाजता बुलढाणा येथून सुटणारी ही बस बंद झाल्याने मेरा, अंत्रीखेडेकर, मोठा मेरा, शिंदी, साखरखेर्डा, गोरेगाव, बाळसमुंद्र, शेंदुर्जन, आंबेवाडी, हनवतखेड, आगेफळ, झोटींगा, मलकापूर पांग्रा, मांडवा, बिबी, किनगाव जट्टू आदी ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. एस. टी. बसचे भाडे मेरा चौकी ते साखरखेर्डा २५ रुपये असताना खासगी वाहनचालकांकडून ५० रुपये आकारले जात असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याच मार्गावरील दुपारी चार वाजता बुलढाणा ते किनगाव जट्टू जाणारी बस तसेच सकाळी साखरखेर्डा मार्गे बुलढाणा येथे येणारी बसही बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बुलढाणा आगार व्यवस्थापकांनी याची तातडीने दखल घेऊन दोन्ही बससेवा नियमित सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत बससेवा पूर्ववत सुरू न केल्यास मेरा, शिंदी, साखरखेर्डा, गोरेगाव, बाळसमुंद्र, शेंदुर्जन, आंबेवाडी, हनवतखेड, आगेफळ, झोटींगा, मलकापूर पांग्रा, मांडवा, बिबी आदी ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा आगार व्यवस्थापकांची राहील, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, उद्धवसेनेचे नेते व माजी सरपंच रविंद्र पाटील, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, शंकरराव उगलमुगले, बंद्री बोडखे, अनंता शेळके यांच्यासह प्रवासी संघटनेने दिला आहे.