-बंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रियंका भानुदास घुबे हिची बंगळुरू (कर्नाटक) येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बुलढाणा येथे पार पडलेल्या विदर्भस्तरीय १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची विदर्भ राज्य संघात निवड करण्यात आली. यामध्ये मुलींच्या संघात जानकीदेवी विद्यालयाची खेळाडू कु. प्रियंका भानुदास घुबे हिचा समावेश करण्यात आला आहे.
ही राष्ट्रीय खो-खो स्पर्धा गुंजूर खो-खो क्लब, गुंजूर (बंगळुरू, कर्नाटक) येथे दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल बुलढाणा जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव सोर, भारत शिक्षण प्रसारक मंडळ, देऊळगाव घुबेचे संस्थापक अध्यक्ष शेनफडरावजी घुबे, सचिव प्रा. उद्धवराव घुबे तसेच विद्यालयाचे प्राचार्य हरिदासजी घुबे यांनी प्रियंकाचे अभिनंदन करून तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.