-कृषी तंत्रज्ञानाचा होणार जागर; लाभ घेण्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. झापे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
बुलढाणा (जिल्हा प्रथिनिधी) : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विभाग व आत्मा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अग्रोटेक–२५’ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन २७ ते २९ डिसेंबरदरम्यान अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर करण्यात आले आहे. सदर कृषी प्रदर्शनीत कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे यांनी केले आहे.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीत कृषी विद्यापीठ व संलग्न कृषी संस्थांची दालने, विद्यापीठातील शास्त्रज्ञांसोबत विविध विषयांवर चर्चासत्रे, कृषी अवजारे व उत्पादनांची दालने, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची दालने, तसेच मत्स्य व्यवसाय व कृषी व ग्रामीण उद्योग विभागाची दालने उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर फुले, फळे व भाजीपाल्याचे प्रदर्शनही असणार असून, बचत गटांचाही सहभाग राहणार आहे. तसेच विद्यापीठ प्रकाशनांचे दालनसुद्धा या प्रदर्शनीत ठेवण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील डॉ. अमोल झापे यांनी केले आहे.