– झेडपी व पंचायत समित्यांची सत्ता मिळवण्यासाठी गावोगावी लढाई पेटणार!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बहुप्रतीक्षित बिगुल अखेर वाजण्याच्या मार्गावर असून, डिसेंबरअखेर किंवा याच आठवड्यात आचारसंहिता लागू होणार असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने प्रशासनात धावपळ सुरू झाली असून, प्रलंबित कामे उरकण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तर महापालिका निवडणुकांची धामधूम सध्या सुरू आहे. मात्र आता तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे गावोगावातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून येणार आहे.
बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, बीड, अमरावतीसह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सर्व ठिकाणी निवडणूक प्रक्रियेची चक्रे वेगाने फिरू लागली असून, डिसेंबर अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये ही मर्यादा ओलांडली असल्याने, त्या वगळून उर्वरित १५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यामुळे निवडणूक आयोगावर मोठा वेळेचा तगादा आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस किंवा सोमवारी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता बळावली आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया, छाननी आणि मतदानाचा कार्यक्रम झपाट्याने पार पडून २८ ते २९ जानेवारीदरम्यान मतदान व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याने, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर महापालिकांच्या निवडणुकांसाठीही हालचाली सुरू आहेत. एकूणच आचारसंहिता लागू होताच ग्रामीण आणि शहरी राजकारणात एकाचवेळी निवडणुकीचा धुरळा उडणार, हे निश्चित मानले जात आहे.