-प्रतापगड पोखरला! आमदार खरातांच्या नियोजनाने मेहकरात पेटली मशाल! लोणार, शेगाव व मलकापूरमध्ये नगराध्यक्षपदावर काँग्रेसचा झेंडा!
-बुलढाण्यात धनुष्यबाणाचा अचूक नेम! देऊळगाव राजात अजित पवार गट, तर सिंदखेड राजात शरद पवार गटाचा गुलाल!
बुलढाणा (बाळू वानखडे) : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील अकराही नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज, २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. या निकालांत आमदारांनी आपले गड शाबूत ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. खामगाव, चिखली, नांदुरा व जळगाव जामोद येथे नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. मेहकरमध्ये मात्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा प्रतापगड चांगलाच पोखरला गेला असल्याचे दिसून येत आहे. येथे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या परफेक्ट नियोजनामुळे नगराध्यक्षपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ची मशाल पेटली आहे. तसेच लोणार, शेगाव व मलकापूर येथे नगराध्यक्षपदावर काँग्रेसने बाजी मारली आहे. बुलढाण्यात शिवसेना (शिंदे गट) ची सरशी झाली असून, देऊळगाव राजात अजित पवार गट, तर सिंदखेड राजात शरद पवार गटाने विजयाचा गुलाल घेतला आहे.
गेल्या आठ ते नऊ वर्षांनंतर नगरपरिषदांच्या निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांनी मोठ्या तयारीने या निवडणुकीला सामोरे गेले होते. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी २ व २० डिसेंबर रोजी मतदान पार पडले, तर त्याचे निकाल आज, २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. खामगावमधून सौ. अपर्णा सागर फुंडकर, चिखलीमधून पंडितराव देशमुख, तर जळगाव जामोद येथून गणेश दांडगे विजयी झाले आहेत. येथे मंत्री आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले व आमदार संजय कुटे यांनी आपले गड शाबूत ठेवल्याचे दिसून येते. नांदुरा नगराध्यक्षपदी भाजपच्या मंगलाताई मुर्हेकर विजयी झाल्या असून, येथेही आमदार चैनसुख संचेती यांचा वरचष्मा कायम राहिला. चिखलीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मेहकर नगराध्यक्षपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे किशोर गारोळे विजयी झाले असून, काँग्रेसचे कासम गवळी दुसऱ्या, तर शिवसेना (शिंदे गट) चे अजय उमाळकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. येथे आमदार सिद्धार्थ खरात यांचे परफेक्ट नियोजन यशस्वी ठरले असून, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा प्रतापगड चांगलाच पोखरला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरापूर्वी शिंदे सेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांचा पराभव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत केला होता. मेहकर नगरपरिषदेत काँग्रेससोबत आम्ही मैत्रीपूर्ण लढत दिली असून, दोन्ही पक्षांचे मिळून १७ नगरसेवक निवडून आल्याने मेहकरची जनता महाविकास आघाडीसोबत असल्याचे दिसून येते, असे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले. त्यामुळे आता मेहकर नगरपरिषदेत महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
लोणार नगराध्यक्षपदी मीरा भूषण मापारी, शेगाव अध्यक्षपदी प्रकाश शेगोकार, तर मलकापूर नगराध्यक्षपदी अतिक जवारीवाले हे तिन्ही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये आमदार संजय कुटे यांना शेगावमध्ये, तर आमदार चैनसुख संचेती यांना होम ग्राउंड असलेल्या मलकापूर नगरपरिषदेत पराभवाला सामोरे जावे लागले. बुलढाणा नगराध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड विजयी झाल्या. येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. देऊळगाव राजा नगरपालिकेत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या आघाडीला मोठा फटका बसला असून, येथे आमदार मनोज कायंदे यांची जादू कामी आली. येथून अजित पवार गटाच्या मधुरीताई शिंपने विजयी झाल्या.
सिंदखेड राजाचा गड माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काबीज केला असून, येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सौरभ तायडे या तरुण नेतृत्वाला जनतेने कौल दिला आहे. विजयाबद्दल अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. नगराध्यक्षांसह नगरसेवक पदांचेही निकाल जाहीर झाले असून, आता सत्ता स्थापनेसाठी कोणता पक्ष कोणासोबत जातो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.