-निकालाच्या क्षणांसाठी सिंदखेडराजा सज्ज, प्रशासन-पोलीस यंत्रणा सतर्क
सिंदखेडराजा(सुरेश हुसे): नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाची वेळ जवळ येताच सिंदखेडराजा शहरात तणावपूर्ण शांतता पसरली असून, मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतमोजणी केंद्र आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी सिंदखेडराजा नगर परिषदेची निवडणूक शांततेत पार पडली. शहरातील २१ मतदान केंद्रांवर मतदान झाले असून १० प्रभागांतील २० नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून मतदान घेण्यात आले. यावेळी तब्बल ८५.०८ टक्के विक्रमी मतदान झाले असून मतदारांनी मोठ्या उत्साहात लोकशाहीचा अधिकार बजावला.
मतमोजणीपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मतमोजणी केंद्राची सखोल पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक आशिष इंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. स्ट्रॉंग रूम, मतमोजणी सभागृह तसेच परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रत्येक हालचालीवर करडी नजर राहील, असे स्पष्ट करण्यात आले.
रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता EVM स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार असून सर्व उमेदवारांनी नगर परिषद कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे. सकाळी १० वाजता नगर परिषद सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना चार मतमोजणी प्रतिनिधींची, तर नगरसेवक उमेदवारांना प्रत्येकी एका प्रतिनिधीची परवानगी देण्यात आली आहे. चार टेबलांवर टप्प्याटप्प्याने मतमोजणी होणार असून नगराध्यक्ष पदाची मतमोजणी प्रत्येक प्रभागासोबतच सुरू राहून प्रभाग क्रमांक १० सोबत अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, श्रावण डोंगरे, शहर अभियंता हामीद काझी, नितीन बोडखे, ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. नियमभंग, घोषणाबाजी, गोंधळ किंवा गैरप्रकार सहन केला जाणार नसून अशा प्रकारांना तत्काळ कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
बॉक्स : प्रशासनाचा कडक इशारा
मतमोजणीदरम्यान शांतता राखणे सर्वांची जबाबदारी आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सिंदखेडराजाचे लक्ष निकालाकडे लागले असून कोण बाजी मारणार, कोणाचा पराभव होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.