-पाणी मुबलक असताना चार महिने नळ कोरडे, सरपंच-अधिकारी गैरहजर
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या दुसरबीड ग्रामपंचायतीच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खडकपूर्णा नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही वार्ड क्रमांक १ व २ मध्ये गेल्या चार महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. पाण्यासाठी हैराण झालेल्या महिलांनी अखेर ग्रामपंचायतीवर धडक देत आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली.
पिण्याच्या पाण्यासाठी दररोज टँकरवर अवलंबून राहावे लागणे, हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करणे आणि घराघरांतून उसळणारा असंतोष, अशी विदारक स्थिती आज दुसरबीड गावात पाहायला मिळत आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने त्रस्त महिलांनी शुक्रवारी (दि. १९) थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र यावेळी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी दोघेही गैरहजर असल्याचे समजताच संतप्त महिलांचा रोष अधिकच वाढला.
यावेळी प्रतिक्रिया देताना सिंदखेडराजा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव देशमुख यांनी ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून वर्षभर टँकर विकत घेण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र कर्मचाऱ्यांकडून चुकीची माहिती दिली जात असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी अशोक बुरकुल यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी खुलासा करत सांगितले की, ग्रामपंचायतीची जुनी पाईपलाईन सध्या कार्यरत आहे. मात्र नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जागोजागी पाईपलाईन तोडल्यामुळे ती अद्याप पूर्णपणे जोडलेली नाही. त्यामुळे काही वार्डांमध्ये पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. संबंधित ठेकेदाराला स्मरणपत्र देण्यात आले असून गटविकास अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणी मुबलक असतानाही नियोजनाअभावी गाव तहानलेले असताना आता तरी जबाबदार अधिकारी जागे होणार का, की महिलांचा हा संताप आणखी उग्र रूप धारण करणार, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.