-सिंदखेडराजा तालुक्यात महसूल प्रशासनाची कारवाई
सिंदखेडराजा (सुरेश हुसे )- सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती उत्खननाचे प्रकार पुन्हा वाढू लागले असून, खडकपूर्णा नदीपात्रात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या बिनधास्त रेती उत्खननावर महसूल प्रशासनाने कारवाई करत जेसीबीसह हा प्रकार उधळून लावला आहे. हिवरखेड पूर्णा शिवारातील सरकारी पाणंद रस्त्यालगत जेसीबीच्या सहाय्याने रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल पथकाने पहाटे दोनच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार अजित दिवटे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत नायब तहसीलदार डॉ. प्रविणकुमार वराडे, ग्राम महसूल अधिकारी गोरखनाथ पवार व विष्णू थोरात सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान जेसीबी थेट नदीपात्रात उतरवून रेती उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
जेसीबी चालक पवन सुभाष आढे (वय २५, रा. किनगाव जट्टू, ता. लोणार) याच्याकडे चौकशी केली असता रेती उत्खननासाठी कोणताही परवाना अथवा अधिकृत मंजुरी नसल्याचे समोर आले. पुढील तपासात संबंधित जेसीबीचे मालक नारायण त्रंबक फलटणकर (रा. राहेरी बु., ता. सिंदखेडराजा) असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी जेसीबीसह चालक व मालकाला किनगाव राजा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच गौण खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपूर्णा नदीपात्र, सरकारी रस्ते आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी अवैध रेती उत्खननाविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. मात्र, अशा प्रकारचे उत्खनन रात्रीच्या वेळी निर्ढावलेपणाने कसे सुरू असते, यामागे आणखी कोणाचे पाठबळ आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.