– प्रवाशांचा हक्काचा माहूरगड मार्ग ‘प्रासंगिक करारा’च्या नावाखाली गिळला!
– चाळीसगाव आगाराच्या मनमानी कारभारावर प्रवाशी सेवा संघटनेचा थेट हल्ला!
लोणार (वाजिद खान): जागतिक वारसा असलेल्या लोणारमार्गे धावणारी आणि हजारो नागरिकांची जीवनवाहिनी असलेली चाळीसगाव-माहूरगड ही एकमेव महत्त्वाची बसफेरी मनमानी पद्धतीने बंद करून राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या संयमाची परीक्षा घेणे सुरू केले आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झालेली ही बससेवा चाळीसगाव आगाराने ‘प्रासंगिक करार’ आणि ‘शालेय सहल’ अशा बाष्कळ सबबी देत दडपून टाकली आहे.
चाळीसगाव, कन्नड, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिंदखेडराजा, लोणार, वाशिम आणि माहूरगड अशा लांब पल्ल्याच्या मार्गावर सेवा देणारी ही एकमेव ‘लाल परी’ प्रवाशांसाठी अत्यंत मोलाची होती. चांगला प्रतिसाद आणि चांगले भारमान मिळत असतानाही केवळ स्वतःच्या सोयीसाठी ही बससेवा बंद करून प्रवाशांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. या उर्मट कारभाराविरोधात प्रवाशी सेवा संघटना, लोणार आक्रमक झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष उस्मान शेख, सचिव भागवत खरात आणि उपाध्यक्ष अशोक काटकर यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विभाग नियंत्रक (जळगाव), विभागीय वाहतूक अधिकारी (जळगाव) आणि आगार व्यवस्थापक (चाळीसगाव) यांना वारंवार पत्रव्यवहार करून हा एकमेव महत्त्वाचा मार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. “प्रशासनाने वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे म्हणजे महामंडळाची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहे. ही बससेवा प्रवाशांचा हक्क आहे, प्रशासनाची मेहेरबानी नाही!” असे परखड मत उस्मान शेख यांनी व्यक्त केले. चाळीसगाव-माहूरगड बसफेरी तात्काळ पूर्ववत सुरू न केल्यास, संपूर्ण महामंडळ प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रवाशांच्या रोषाला महामंडळ जबाबदार राहील, असा थेट इशारा प्रवाशी सेवा संघटनेने दिला आहे.