-जर्मनीच्या मेट्रोतील एका क्षणाने गाठले आयुष्यभराचे वळण; ‘मॅसी विल्यम्स’ शेजारी असतानाही बेफिकीर असणाऱ्या तरुणाला प्रतिष्ठित मासिकाने दिली नोकरी!
म्युनिख (जर्मनी): एका क्षणामध्ये संपूर्ण आयुष्याची दिशा कशी बदलते, याची अविश्वसनीय कहाणी जर्मनीच्या एका गर्दीच्या मेट्रोतून समोर आली आहे. भारतातून जर्मनीत आलेला एक तरुण खिडकीकडे पाहत शांतपणे बसला होता. त्याच्या डोळ्यांत भविष्याची अनिश्चितता, थकवा आणि मनात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो जर्मनीत अनोळखी, एकटा आणि बेकायदेशीररीत्या राहत असल्यामुळे त्याला त्याच्या आजूबाजूच्या जगाची पर्वा नव्हती. त्या तरुणाच्या शेजारी एक गोरी मुलगी बसली आहे, याची त्याला काडीमात्रही कल्पना नव्हती. पण त्याच साध्या क्षणाचा कोणीतरी काढलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि पाहता पाहता तो संपूर्ण जर्मनीमध्ये व्हायरल झाला. कारण त्या मुलाच्या शेजारी बसलेली ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून, ती जागतिक स्तरावर प्रसिद्ध अभिनेत्री, मॅसी विल्यम्स—‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेतील स्टार होती!
जर्मनीतील प्रतिष्ठित मासिक “डेर स्पीगल” च्या पत्रकारांना हा भारतीय तरुण खूपच कुतूहलाचा वाटला. इतकी मोठी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी शेजारी असतानाही हा तरुण इतका अलिप्त का आणि तो कोण आहे, या प्रश्नाने झपाटलेल्या पत्रकारांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर तो तरुण म्युनिखमध्ये सापडला. तेव्हा त्याच्या बेकायदेशीर वास्तव्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. पत्रकाराने त्याला थेट प्रश्न विचारला, “तुला माहीत आहे का, तुझ्या शेजारी मॅसी विल्यम्स बसली होती? लाखो लोक तिच्यासोबत एक फोटो काढायला उत्सुक असताना तू तिच्याकडे पाहिले सुद्धा नाहीस. कारण काय?” या प्रश्नावर तो तरुण क्षणभर थांबला. हलकंसं हसला आणि त्याने जे उत्तर दिले, ते थेट माणसाच्या परिस्थितीवर भाष्य करणारे आणि अत्यंत संवेदनशील होते. तो म्हणाला, “जेव्हा डोक्यावर छप्पर नाही… हातात काम नाही… खिशात एकही युरो नाही… आणि रोज प्रवासासाठी तिकीट काढण्याइतकेही पैसे नसतात… तेव्हा शेजारी कोण बसलंय, याला काहीच अर्थ उरत नाही.” त्याच्या या प्रामाणिकपणाने आणि परिस्थितीने मासिकाचे पत्रकार अक्षरशः भारावून गेले. त्याच्या जिद्दीने प्रभावित होऊन, ‘डेर स्पीगल’ मासिकाने त्याला थेट मदतीचा हात दिला. मासिकाने त्याला महिन्याला ८०० युरो पगाराची पोस्टमनची नोकरी ऑफर केली.
─────────────────────────────────────────────────────────────────────────────
नियतीचे धागे!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या क्षणी त्याच्या हातात नोकरीचा करार (जॉब कॉन्ट्रॅक्ट) आला, त्याच क्षणी त्याचा जर्मनीत कायदेशीर राहण्याचा परवाना देखील कोणताही अडथळा न येता मंजूर झाला! एका व्हायरल फोटोतून नियतीने गाठलेले हे वळण खूप काही शिकवून जाते. नियतीचे धागे आपल्याला दिसत नसले तरी ते घट्ट विणलेले असतात; प्रत्येक क्षण, प्रत्येक भेट, नकळतपणे आपल्या पुढच्या आयुष्याची तयारी करत असते. आयुष्याची स्क्रिप्ट आधीच लिहिलेली असते… आणि पुढच्या क्षणी काय घडेल, हे कुणालाच ठाऊक नसतं.