– सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवाराची संशयास्पद माघार; राजकारण पेटले!
– ‘वंचित’चे उमेदवार जलिल शे. बनेमियांचा अर्ज माघारी; सिंदखेडराजा निवडणुकीत खळबळजनक आरोपांचा भडका!
– ‘नाझेर काझी यांनी उमेदवारावर दबाव टाकून किडनॅपसारखी परिस्थिती निर्माण केली – प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीत आज नाट्यमय घडामोड घडली. वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शे. जलिल शे. बनेमिया यांनी अचानक अर्ज माघारी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय खळबळ उडाली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सविताताई मुंढे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष व अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. ‘नाझेर काझी यांनी उमेदवारावर दबाव टाकून किडनॅपसारखी परिस्थिती निर्माण केली, असा आरोप सौ. मुंढे यांनी करत, काझी यांच्यावर टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे, अर्जमाघारीनंतर शे. जलिल शे. बनेमिया हे गायब झालेले असून, ते कुठे आहेत, याचा काही ठावठिकाणी नसल्याचेही दिसून येत आहे.
पत्रकार परिषदेत सौ. सविताताई मुंढे म्हणाल्या, की ‘आम्ही सुरुवातीपासून सर्व उमेदवारांच्या मुलाखती तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत घेतल्या. अर्ज भरल्यापासून आम्ही उमेदवारांच्या सतत संपर्कात होतो. परंतु अर्ज मागे घेण्याच्या आधी आमचे तालुकाध्यक्ष मधुकर साळवे यांनी अॅड. नाझेर काझी हे आमच्या उमेदवाराच्या घरी बसलेले पाहिले.’ ‘अर्ज मागे घेण्याच्या वेळीही उमेदवार काझी यांच्या गाडीत बसलेले दिसले. हा प्रकार संशयास्पद असून, उमेदवारावर दबाव टाकून किडनॅपसारखी परिस्थिती निर्माण केली गेली आहे. याबाबत आम्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत.’, असेही सौ. सविताताई मुंढे यांनी सांगितले. यावेळी ‘वंचित’चे तालुकाध्यक्ष मधुकर साळवे यांनीही सांगितले, की ‘उमेदवार अचानक संपर्काबाहेर गेले. आणि दरम्यान त्यांच्या घरी अॅड. नाझेर काझी बसलेले असल्याचे आम्ही पाहिले.’ या पत्रकार परिषदेस पक्षाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धडाकेबाज आरोपांमुळे सिंदखेडराजा नगर परिषद निवडणुकीत नवा भूचाल येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
सविताताई मुंढे म्हणाल्या —
“उमेदवारांच्या मुलाखतीपासून अर्ज प्रक्रियेपर्यंत आम्ही सर्व काही पक्षपातळीवर पारदर्शकपणे केले. पण अर्ज मागे घेण्याच्या अगोदरच आमचे तालुकाध्यक्ष मधुकर साळवे यांनी अॅड. नाझेर काझी आमच्या उमेदवाराच्या घरात बसलेले पाहिले. ही बाबच संशयास्पद!” “अर्ज माघारीच्या वेळीही उमेदवार काझी यांच्या गाडीत बसवलेले दिसले! हा प्रकार पूर्णपणे संशयास्पद असून उमेदवारावर दबाव टाकून किडनॅपसारखी परिस्थिती निर्माण केली गेली. हा प्रकार गंभीर आहे, याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत.”