– काँग्रेसचे काशिनाथआप्पा बोंद्रे की भाजपचे पंडितराव देशमुख?; चिखलीकरांचा कौल कुणाला?
– विधानसभेला चिखलीकरांनी सावधपणे मतदान केले; तीच पुनर्रावृत्ती नगरपरिषदेत होणार का?
चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली असून, सद्या तरी काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसून आले आहे. सत्ताधारी भाजपच्या आमदार असतानादेखील चिखली शहरात विकासकामांचा मोठा अनुशेष बाकी असून, रस्ते, पाणी या समस्यांचा डोंगर उभा आहे. तसेच, शहरातील सामाजिक वातावरण मोठ्या प्रमाणात कलुषित झालेले दिसून येत आहे. सत्ताधारी गटाची हीच कमकुवत बाजू हेरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. विधानपरिषद निवडणुकीत आमदार श्वेताताई महाले पाटील या फक्त ३२०१ मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांच्या विजयात चिखली शहरवासीयांचा वाटा फारच कमी होता. ग्रामीण भागातून साथ मिळाल्याने त्यांना विजयश्री प्राप्त झाली. याच निवडणुकीची पुनर्रावृत्ती नगरपरिषद निवडणुकीतदेखील होते का? असा प्रश्न निर्माण झाला असून, काँग्रेस-महाआघाडीने काळजीपूर्वक नियोजन केल्याने भाजपला त्याचा फटका बसू शकतो.
चिखली नगरपरिषद निवडणुकीत वंचित आघाडी व काँग्रेसची युती तुटली असली तरी, मतविभाजनाचा धोका पाहाता, चिखलीकर सावधानपूर्वक मतदान करताना दिसणार आहेत. या निवडणुकीत भाजपचा थेट काँग्रेसशी सामना असून, प्रभागा-प्रभागातील लढती पाहाता, काँग्रेसने स्थानिक समिकरणे पाहून उमेदवार दिले आहेत. यापूर्वी, प्रियाताई बोंद्रे यांच्या कार्यकाळात शहरातील मुख्य मार्ग जसे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सिद्ध सायन्स चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बीडीसीसी बँक चौक, राजे संभाजीनगर ते चिंचपरिसर, राऊतवाडी ते अण्णाभाऊ साठे पुतळा ते बसवेश्वर महाराज चौक हे शहरातील सर्व प्रमुख रस्ते, तसेच ३५० हून अधिक अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले. शहर उजळविण्यासाठी तब्बल ७५०० स्ट्रीट लाईट बसवून वाहतूक, सुरक्षा आणि सुंदरता यांना नवा आयाम देण्यात आला होता. विकासकामांचा हा झंजावात नंतरच्या काळात थांबला होता. हा अनुभव पाहाता, चिखलीकरांनी विधानसभेच्या निवडणुकीत सावधपणे मतदान केले होते. त्यामुळे आता काँग्रेस -महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काशिनाथआप्पा बोंद्रे यांच्याविषयी चिखलीकरांतून सहानुभूतीची लाट दिसून येत आहे. दुसरीकडे, भाजपचे उमेदवार पंडितराव देशमुख यांची प्रचार यंत्रणा ठरावीक मुद्दे हाती घेऊन प्रचार करताना दिसत आहे. परंतु, दलित, अल्पसंख्यांक, ओबीसी या घटकांच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. रस्ते, पाणी आणि विकास या मुद्द्यांवर चिखली शहरात त्यांचा पक्ष पिछाडीवर दिसून येत आहे. जातीय समिकरणे नजरेसमोर ठेवून पंडितराव देशमुख यांना उमेदवारी मिळाली असावी, असे वाटत असले तरी, दलित, अल्पसंख्यांक समाजाला ती कितपत रूचेल? असाही प्रश्न निर्माण होतो. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप दोन्हीही पक्ष एकमेकांवर करत असले तरी, त्यातून कोणत्याही पक्षाला आपले मतदान निर्माण करता येणे अशक्य आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपसाठी ही निवडणूक तुल्यबळ वाटत असली तरी प्रभागनिहाय ती काँग्रेससाठी अनुकूल वाटत आहे. तरीदेखील चिखलीकर आपला काय कौल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.