– संगीत भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन
– दि.२८ नोव्हेंबरला होणार लाखो भाविकांना महाप्रसाद वितरण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या तीर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा ९० वा जन्मोत्सव सोहळा दि.२८ नोव्हेंबररोजी साजरा होत आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबर पासून भागवत कथाकार हभप. अनिरुद्ध महाराज क्षीरसागर उर्फ नित्यानंद स्वामी आळंदी यांच्या नेतृत्वाखाली भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तर ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व हभप. शंकर महाराज देवकर आणि हभप. एकनाथ महाराज इंगळे हे करणार आहेत.
दिनांक २१ ते २८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ४ वाजता काकडा आरती, ६ वाजता विष्णू सहस्त्रनाम, ७ ते ९:३० पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, १२ वाजता भागवत कथा, ६ वाजता हरिपाठ, ७ वाजता कीर्तन व १० नंतर जागर अशी कार्यक्रमाची रुपरेषा असून, याचे नेतृत्व हभप. रामकृष्ण कचाले, प्रकाश महाराज मगर, कृष्णा महाराज मोरे यांच्याकडे आहे. दि.२१ तारखेला हभप बबनराव महाराज खारडे, दि.२२ ला ज्ञानेश्वर महाराज भुतेकर शास्त्री, दि.२३ ला संजय महाराज अलोणे पुणे, दि.२४ ला हभप अक्षय महाराज भोसले (प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना), दि.२५ ला रामनाथ महाराज शास्त्री, दि.२६ ला हभप भागवत महाराज कदम अवलगावकर गंगाखेड, दि.२७ ला हभप पोपटराव पाटील महाराज याची कीर्तन सेवा आयोजित केली आहे. आणि दि.२८ नोव्हेंबरला काल्याचे कीर्तन अनिरुद्ध महाराज यांचे होणार आहे. सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, आमदार सिध्दार्थ खरात, आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, माजी आमदार अमित झनक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, सुधाकर गारोळे, विजय जाधव यांच्याहस्ते महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष दिनकरराव देशमुख, व्यवस्थापक जनार्दन गुंजकर यांनी दिली.