– सावरगाव डुकरे येथील थरारक हत्याकांड; घरगुती वादातून हत्याकांडाची शक्यता!
– पोलिसांकडून तपास सुरू; पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी
चिखली (राजेश लोखंडे/महेंद्र हिवाळे) – दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन मुलाने आई-वडिलांचा कुर्हाडीने निर्घृण खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे उघडकीस आली आहे. काल रात्री (दि.५) हे थरारक हत्याकांड घडले. विशाल सुभाष डुकरे (वय 32) असे या घटनेतील आरोपी मृत मुलाचे नाव असून, त्याने सुभाष डिगांबर डुकरे (वय 67) व लता सुभाष डुकरे (वय 55) या आई-वडिलांची कुर्हाडीने खांडोळी केली. या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा करून मृतदेह चिखली उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
विशाल डुकरे याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नीदेखील त्याला सोडून गेली होती. दारूच्या नशेत तो सातत्याने आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करत होता. काल रात्रीदेखील त्याने आई-वडिलांशी वाद घातला. रागाच्या भरात त्याने वडिल व आई यांची कुर्हाडीने निर्घृण हत्या केली. पहाटे हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्याचे सांगण्यात येते. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी चिखली पोलिसांना या घटनेची माहिती देताच, चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे व त्यांचे सहकारी सावरगाव डुकरे येथे पोहोचले. त्यांनी वरिष्ठांना तातडीने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी व ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी योगेश भुसारी व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. आई व वडिलांची कुर्हाडीने खांडोळी केल्यानंतर विशाल डुकरे यानेदेखील घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. पोलिसांनी डुकरे यांचे घर सील केले असून, या हत्याकांडाचा कसून तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल डुकरे हा काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेला होता. काल रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. घरात झोपलेल्या आई-वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर त्याने कुऱ्हाडीने वार करून दोघांना जागीच ठार केले. नंतर अपराधीपणातून किंवा नशेत असताना त्याने घरातच फाशी घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून, फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या पथकानेही तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, दारूच्या व्यसनामुळे मानसिक असंतुलन निर्माण होऊन हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.