– मंत्री आकाश फुंडकर जिल्हा निवडणूक प्रभारी, आ. संजय कुटे अमरावती जिल्ह्याचे प्रभारी
बुलढाणा (बाळू वानखेडे) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपले जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी जाहीर केले असून, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यावर घाटावरील बुलढाणा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्यावर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपरिषदांच्या निवडणुका आ. श्वेताताई महाले पाटील यांच्याच नेतृत्वात लढविल्या जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात भाजपने घाटाखाली व घाटावर असे दोन निवडणूक प्रमुख दिले आहेत. घाटावर जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आ. श्वेताताई महाले पाटील यांची तर घाटाखाली खामगावकरिता माजी आमदार चैनसुख संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री आकाश फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांची अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने नियुक्ती केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.