– राज्य शासनाकडून अद्यापही सोयाबीन खरेदीबाबत आदेशच नाही!
– मुख्यमंत्र्यांचे आश्वासन शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे?
– खरेदी सुरू होण्याआधीच अनियमिततेची भीती; दक्षता समित्या नियुक्तीची घाई!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – अतिवृष्टीने शेतकर्यांची पिके उद्ध्वस्त झालेली असताना थोड्याफार पिकलेल्या सोयाबीनलादेखील भाव मिळेनासा झाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती. दरम्यान, शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार असल्याचे सांगितले होते. तसेच, शेतकर्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहनही फडणवीस यांनी शेतकर्यांना केले होते. परंतु, आजपासून सोयाबीन खरेदीचे आदेश अद्यापही पोहोचले नसून, आजपासून सोयाबीन नोंदणी सुरू होणे कठीण असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. दुसरीकडे, शेतकरी मात्र नोंदणी सुरू होण्याची वाट पाहतो आहे. दरम्यान, सोयाबीन खरेदीतील अनियमितता रोखण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर दक्षता समित्या नियुक्तीचे आदेश मात्र काल, दि. २९ ऑक्टोबर रोजीच धडकले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सोयाबीन खरेदीविषयी माहिती दिली होती. मुख्यमंत्री म्हणाले होते की, सरकार राज्यात कापूस आणि सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे. त्यासाठी शेतकर्यांची नोंदणी केली जाणार आहे. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकर्यांना ३० ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर हमीभावाने खरेदी सुरू होईल. त्यामुळे कोणत्याही शेतकर्याने कमी भावात व्यापार्यांना सोयाबीन विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. शेतकर्यांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व शेतकर्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच जे शेतकरी हमीभावाने आले सोयाबीन विकू इच्छितात, त्या सर्वांचे सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. राज्य सरकार, पणन विभाग, नाफेड आणि केंद्र सरकारने राज्यात खरेदीचे जाळे निर्माण केले आहे. सरकार शेतकर्याच्या सर्व सोयाबीनची खरेदी करेल. व्यापारी हमीभावाने खरेदी करणार असेल तरच शेतकर्यांनी व्यापार्यांना माल द्यावा. अन्यथा सरकारी खरेदी केंद्रांवर हमीभावाने सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले होते. परंतु, आज ३० तारीख आली तरी सोयाबीन खरेदीचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी सोयाबीन खरेदी नोंदणीची वाट पाहात असल्याचे दिसून येत आहे.
या वर्षी सोयाबीन १८ लाख ५० हजार टन, मूग ३ लाख ३० हजार आणि उडीद ३२ लाख ५६ हजार क्विंटल खरेदीसाठी केंद्र सरकारने मान्यता आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात ११ लाख २१ हजार टन सोयाबीन खरेदी केली होती. यंदा महाराष्ट्रात ७५ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे २० लाख टन खरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी अॅप आणि पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. खरेदी केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी अॅपवर तारीख आणि वेळ नमूद करण्याची सोय आहे. त्यामुळे नोंद केलल्या वेळेला माल केंद्रावर घेऊन जावा, असे आवाहन काल पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले होते. यंदाच्या खरिपातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी गुरुवारपासून (ता. ३०) नोंदणी सुरू होणार असून, १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली होती. तसेच बारदान्याअभावी फजित होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेतली आहे. पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबविणार असून यंदा तुटवडा भासणार नाही यासाठी आम्ही दक्ष आहोत, असेही मंत्री रावल म्हणाले होते.