– किनगावराजा पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न फसला; आठ शेतकर्यांची फसवणूक चव्हाट्यावर!
सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील लिंगा (देवखेड) येथील तरुण पवन प्रल्हाद जायभाये याने स्वतःचे विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत त्याने ‘किनगाव राजाचे ठाणेदार आणि काही लोकांच्या त्रासाला कंटाळलो’ असे म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, या मागचं सत्य आता पोलिस चौकशीत उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न त्याने केला असल्याचे दिसून येत असून, त्याने आठ शेतकर्यांची फसवणूक केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.
याबाबत, किनगावराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पोलिस प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी रचलेला होता. पवन जायभाये याच्यावर अनेक शेतकर्यांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत. दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी पुष्पा प्रल्हाद जायभाये (राहणार लिंगा) यांनी कारभारी सांगळे व इतर दोन जणांविरोधात घरासमोर शिवीगाळ व वादविवाद झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. ही तक्रार पैशाच्या वादावरून असल्याने ती चौकशीवर ठेवण्यात आली. यानंतर २७ ऑक्टोबर रोजी पुष्पा जायभाये यांचा मुलगा पवन प्रल्हाद जायभाये (वय ३२) याने रामेश्वर सांगळे (राहणार जऊळका) यांनी त्याची बैलजोडी चोरून नेल्याचा आरोप करीत तक्रार दिली. चौकशीत मात्र गैरअर्जदार सांगळे यांनी स्पष्ट केले की, प्रल्हाद जायभाये यांनी घेतलेल्या कापसाच्या पैशाच्या बदल्यात ही बैलजोडी तात्पुरती वापरण्यास दिली होती. त्यानंतर इतर शेतकर्यांनीही पवन जायभाये व त्याचे वडील प्रल्हाद जायभाये यांनी त्यांच्या शेतीचा माल घेऊन पैसे दिले नसल्याचे पोलिसांना अर्जाद्वारे कळविले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रल्हाद जायभाये यांना समजपत्र देऊन ‘जर आपण चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत, तर सर्व शेतकर्यांच्या तक्रारींवरून तुमच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल’ अशी सूचना केली होती. ही सूचना मिळाल्यानंतर पवन जायभाये यांनी आपल्या राहत्या घरी एक व्हिडिओ क्लिप तयार केली, ज्यात त्याने ‘ठाणेदार आणि संबंधित लोक माझ्या मृत्यूस कारणीभूत असतील’ असे म्हटले आणि त्या दरम्यान विषारी कीटकनाशक प्राशन केले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होताच गावात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र बिबी येथे दाखल केले, जिथे डॉक्टरांनी उपचारादरम्यान ‘त्याने कीटकनाशक व अल्कोहोल सेवन केले’ असे सांगून त्याला जालना येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले. पोलिसांनी त्याचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तो देण्यास नकार दिला. अखेर २९ ऑक्टोबर रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच पवन जायभाये जे विषारी औषध प्राशन केले ते एक टॉनिक असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

गुन्हा दाखल – फसवणूक उघडकीस!
पवन जायभाय याने पोलिसांवर दबाव आणून आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आत्महत्येचा बनाव केल्याचे स्पष्ट झाल्याने, त्याच्याविरुद्ध अदाखलपत्र अपराध क्र. ४४५/२०२५, भारतीय नवीन फौजदारी संहिता (बीएनएस) कलम २२६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, पवन जायभाय व त्याचे वडील प्रल्हाद जायभाये यांच्याविरुद्ध एकूण आठ शेतकर्यांनी फसवणुकीबाबत तक्रारी दिल्या आहेत, अशी माहिती ठाणेदार मातोंडकर यांनी दिली. या तक्रारींवर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून आणखी काही शेतकरी पुढे येत असल्याचे समजते. तालुक्यातील या प्रकरणाने शेतकरी वसुलीतील फसवणूक, सामाजिक माध्यमांवर आत्महत्येचे व्हिडिओ, आणि पोलिस प्रशासनावर दबाव निर्माण करण्याच्या नव्या पद्धतींवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ठाणेदार संजय मातोंडकर म्हणाले, की ‘सदर तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करून पोलिसांवर व शेतकर्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशीतून स्पष्ट झाले की हा प्रकार फसवणुकीपासून वाचण्यासाठी आखलेला नाट्यपूर्ण प्रकार होता. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.’