– पक्ष तिकीट देईल त्यांचे काम प्रामाणिकपणे करू – आ. श्वेताताई महाले पाटील; धाड येथे भाजप पक्ष कार्यालयाचे लोकार्पण!
चिखली (राजेश लोखंडे) – पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या विजयासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी करत, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सोयीसाठी, संवादाचे माध्यम आणि सर्वसामान्य जनतेच्या कामांना गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे धाड येथे लोकार्पण सोहळा आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी भूषविले.
या प्रसंगी आमदार श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या की, हे जनसंपर्क कार्यालय हे केवळ पक्षाचे नसून जनतेचे घर आहे. येथून प्रत्येक सामान्य नागरिकाचे प्रश्न, तक्रारी सोडवल्या जातील व कामे वेगाने केली जातील. आपली लढाई व्यक्तींसाठी नसून विचारांसाठी आहे. ज्याला पक्ष तिकीट देईल त्याच्या विजयासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायचे आहे, कारण आपला उमेदवार म्हणजे पक्षचिन्ह ‘कमळ’ आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजपा महायुती सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी अतिवृष्टी मदतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकर्यांना आवश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला असून, पीकविमा रक्कम सुद्धा मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक शेतकर्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात, हा या कार्यालयाचा उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या. या लोकार्पण सोहळ्याला भाजपाचे श्रीरंग आण्णा येंडोल, अनिल जाधव, अॅड. मोहन पवार, योगेश राजपूत, सतीश पाटील भाकरे, कल्याणराव कानडजे, देविदास पाटील जाधव, विठोबा पाटील तायडे, प्रतापशेठ मेहर, डॉ. तेजराव नरवाडे, अॅड. सुनिल देशमुख, राजेश्वर उबरहंडे, प्रदीप टाकसाळ, सौ. अनुराधाताई भुसारी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोर्चा व युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.