– शालिनीताई पाटील व अण्णासाहेब जावळे पाटील जिल्हाबंदी प्रकरणात झाली होती कारवाई!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तब्बल १८ वर्षांच्या न्यायालयीन खटल्यानंतर छावा संघटनेच्या ३६ कार्यकर्त्यांना न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. काल, दि. १३ ऑक्टोबररोजी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला.
दि. १२ जानेवारी २००७ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी प्रशासनाने छावा संघटनेच्या आक्रमक नेत्या शालिनीताई पाटील आणि संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांना जिल्हाबंदी केली होती. मात्र, दोघांनी निर्भयपणे सिंदखेडराजा येथे हजेरी लावली, ज्यामुळे ३६ कार्यकर्त्यांवर विविध आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. सिंदखेडराजा न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत, सर्व ३६ छावा कार्यकर्त्यांना निर्दोष ठरवले, ज्यामध्ये प्रमुख कार्यकर्ते अशोक परसराम जाधव (जिल्हाध्यक्ष, छावा संघटना बुलढाणा), लक्ष्मण रामभाऊ कव्हळे, दीपक गोविंदराव जाधव, कृष्णा गंगाधर कोल्हे, यांसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या खटल्यात बचाव पक्षाचे वकील राहुल विघ्ने यांनी छावा कार्यकर्त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली. निकाल जाहीर होताच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. १८ वर्षांच्या प्रकरणातून अखेर न्याय मिळाल्याने कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद जोरदार व्यक्त केला. आमच्या मेहनतीचा न्याय झाला, १८ वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी झाला,’ अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.