– उद्या जळगाव जामोद येथील वनवासी कल्याण आश्रम परिसरात अंत्यसंस्कार
– जिल्ह्यातील संघ परिवार दुःखसागरात; विविध मान्यवरांकडून आदरांजली
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील रहिवासी तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रम जळगाव जामोदचे प्रभारी संचालक, सद्गुरुभक्त विवेक हरिहरराव जोशी (वय ७०) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि.१५ ऑक्टोबर) वनवासी कल्याण आश्रम जळगाव (जामोद) येथे सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने संघपरिवार दुःखसागरात बुडाला असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.
विवेक जोशी यांचे बंधू विजय जोशी हे सुरत येथे राहातं असल्याने व इतर नातेवाईक पुणे , मुंबई येथे असल्याने उद्या अंतिम संस्कार करण्याचे ठरले आहे. विवेक जोशी हे एसई एस ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य ह. ग. जोशी यांचे जेष्ठ पुत्र होते. लहानपणापासून त्यांना संघ शाखेची आवड होती. साखरखेर्डा येथे ते नियमित शाखा भरविते असतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्यावर जिल्हा प्रचारक म्हणून जबाबदारी टाकली होती. साखरखेर्डा येथील घरही त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाला दान केले होते. असा हा माणूस आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या मागे भाऊ विजय, बहिण वीणा आणि विद्या असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.